मंत्री यशोमती ठाकूर यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाची स्थगिती - high court stays minister yashomati thakurs punishment | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्री यशोमती ठाकूर यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाची स्थगिती

अतुल मेहेरे
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

आधी वाहनचालकासह तिघांनी खाली उतरून वाहतूक पोलिस रौराळे यांच्यासोबत वाद घातला. परंतु ते आपल्या कारवाईवर ठाम होते. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी खाली उतरून रौराळेंसोबत वाद घातला व त्यांना रस्त्यावर थापड मारली. झटापटीत पोलिसाचे कपडेही फाटले होते

नागपूर : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह त्यांच्या तीन कार्यकर्त्यांना अमरावती जिल्हा न्यायालयाने तीन महिने कारावास आणि १५ हजार ५०० रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी हा निकाल देण्यात आला होता. या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. 

अमरावती जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर यशोमती ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मिळाला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. त्यावर आज उपरोक्त निकाल देण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांना नोटीस बजावली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या ठाकूर यांना १५ ऑक्टोबरला आठ वर्ष जुन्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली होती. 

२४ मार्च २०१२ रोजी मंत्री ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीमधील अंबादेवी मंदिराजवळ वाहतूक पोलिस शिपाई उल्हास रौराळे यांच्यासोबत बाचाबाची केली होती. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी रौराळे यांना रस्त्यावरच थापड मारली होती. त्यानंतर रौराळे यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले. फितूर होऊन साक्ष देणारा एक पोलिसही शिक्षेस पात्र ठरला.

यशोमती ठाकूर यांना सत्तेचा माज आहे. त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. जर न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे तर त्यांनी स्वत:च या प्रकरणात आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता. मात्र तो त्यांनी दिलेला नाही. म्हणूनच त्यांच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आंदोलन भारतीय जनता पक्षाने प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात आंदोलन केले होते. 

दुसरीकडे भाजपच्या राज्य उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यशोमती ठाकुरांवर ट्विटच्या माध्यमातून बोचरा वार केला. “गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या विद्यमान मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता पण ‘खिसे गरम’ करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल? असा निशाणा चित्रा वाघ यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर साधला होता.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला जोशी (फालके) यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. त्यात यशोमती ठाकूर, सागर सुरेश खांडेकर, शरद काशीराव जवंजाळ व राजू किसन इंगळे यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. २४ मार्च २०१२ रोजी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास तत्कालीन आमदार यशोमती ठाकूर आपल्या चार साथीदारांसह टाटा सफारी कारने चुनाभट्टी मार्गाने जात होत्या. वनवे असल्यामुळे ड्यूटीवर तैनात वाहतूक पोलिस कर्मचारी उल्हास रौराळे यांनी त्यांना या मार्गाने जाण्यास विरोध केला. आधी वाहनचालकासह तिघांनी खाली उतरून वाहतूक पोलिस रौराळे यांच्यासोबत वाद घातला. परंतु ते आपल्या कारवाईवर ठाम होते. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी खाली उतरून रौराळेंसोबत वाद घातला व त्यांना रस्त्यावर थापड मारली. झटापटीत पोलिसाचे कपडेही फाटले होते. 

त्याप्रकरणी रौराळे यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी यशोमती ठाकूर यांच्यासह चौघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासह मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती जोशी (फालके) यांच्या न्यायालयात सरकारच्या वतीने जिल्हा सहायक सरकारी अभियोक्ता मिलिंद जोशी यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने पाच साक्षीदार तपासले. ॲड. यशोमती ठाकूर यांच्यासह चौघांनाही तीन महिने सश्रम कारावास आणि प्रत्येक १५  हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. नंतर या प्रकरणात यशोमती ठाकूर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मिळाला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख