आझाद मैदानात सुरू झाला जिल्हाधिकाऱ्यांना हटवण्यासाठी लढा - the fight to remove the district collector started in azad maidan | Politics Marathi News - Sarkarnama

आझाद मैदानात सुरू झाला जिल्हाधिकाऱ्यांना हटवण्यासाठी लढा

प्रसाद नायगावकर
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

तुम्ही तुमचे काम कसंही करा, आम्हीही आमचं पोट भरू, पण अशा जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखाली आम्ही काम करू शकत नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी आणि सर्वांची हीच भूमिका आहे. प्रशासनाला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन काम करणारे १४६ डॉक्टर्स पाहिजेत की हा एक आडमुठा अधिकारी

यवतमाळ : जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी काल वैद्यकीय अधिकाऱ्यांना अतिशय उद्धट वागणूक दिल्याचा आरोप करून जिल्ह्यातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी आज आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. त्यांच्या एकूणच वागण्याचा विरोध करीत काल ८९ डॉक्टर्सनी राजीनामे दिले आहेत. डॉक्टरांच्या या आंदोलनाला प्रशासनाच्या सर्वच विभागांतून पाठिंबा मिळत आहे. 

जिल्हाधिकारी सिंह यांनी जिल्हा सोडावा, अशी मागणी आता सर्वच स्तरातून जोर धरू लागली आहे. धरणे आंदोलन सुरू असताना महसूल अधिकारी, तहसीलदार, बीडीओ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी मोर्चा काढून आझाद मैदान गाठले आणि जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध केला. सिंह तानाशाही करतात, असभ्य आणि अशासकीय भाषेत ते नेहमी अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलतात, नेहमी तोडफोडीची भाषा करतात, कायद्याचा धाक दाखवून वारंवार निलंबित करण्याची धमकी देतात, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. 

थोरामोठ्यांना आणि सहकाऱ्यांना सन्मानाची वागणूक देण्याची संस्कृती असलेला हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे त्यांची बिहारी भाषा आणि पद्धत येथे चालणार नाही, असे आज सर्व विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ठणकावले. येथून त्यांची बदली होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांच्या संघटनेकडून सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी आता स्वतःहून यवतमाळ जिल्हा सोडावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. 

उद्या पुन्हा आझाद मैदानात जमतील वैद्यकीय अधिकारी
उद्या सकाळी आझाद मैदानात जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी एकत्र येणार आहेत. संघटनेचे राज्य अध्यक्ष राजेश गायकवाड सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबोधित करतील. आज आयुक्तांसोबत केलेली चर्चा फिसकटली. एक तर जिल्हाधिकाऱ्यांची बदली करा, नाही तर आमचे राजीनामे मंजूर करून आम्हाला सिस्टीममधून बाहेर काढा.

तुम्ही तुमचे काम कसंही करा, आम्हीही आमचं पोट भरू, पण अशा जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखाली आम्ही काम करू शकत नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी आणि सर्वांची हीच भूमिका आहे. प्रशासनाला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन काम करणारे १४६ डॉक्टर्स पाहिजेत की हा एक आडमुठा अधिकारी, असा आमचा प्रशासनाला सवाल असल्याचे संघटनेचे डॉ. विजय अकोलकर यांनी सांगितले. 
(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख