the fall of shiv senas calm restrained and fighting spirit | Sarkarnama

शिवसेनेतील शांत, संयमी व लढवय्या पर्वाचा अस्त

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

शिवसेनेचा पाया अमरावतीत भक्कमपणे रोवणारे शिलेदार व जुन्या अमरावतीच्या बुधवारा येथील आझाद हिंद मंडळाचे प्रमुख पदाधिकारी सोमेश्‍वर पुसतकर यांच्या पार्थिवावर आज येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांच्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली व साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला.

अमरावती : शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख, असा प्रवासाचा दीर्घ पल्ला यशस्वीरीत्या पार करणा-या सेनापतीचा आजाराने बळी घेतला. जिल्हा शिवसेनेतील एक संयमी, अभ्यासू व लढवय्ये पर्व यामुळे संपले. त्यांचे अचानक जाणे मनाला चटका लावणारे ठरले. 1990 च्या दशकात तरुण वयात शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आलेले मितभाषी सोमेश्‍वर पुसदकर बहूआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख या प्रवासात कधीच वादग्रस्त न ठरलेले ते जिल्ह्यातील बहुदा पहिले पदाधिकारी आहेत. थोरले बंधू दत्ताभाऊ पुसदकर यांच्या अपघाती निधनानंतर कुटुंबासह पक्षाची जबाबदारी आलेल्या सोमेश्‍वरने दोन्ही बाजू सक्षमतेने सांभाळल्या, नव्हे तर निभावल्यात. त्यांच्या या बहूआयामी कार्यामुळेच ते जनमानसासोबतच दिवंगत शिवसेनाप्रमुख यांच्या आवडीचेही बनले होते.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ते निकटवर्तीय झाले. शांत व संयमी वृत्तीच्या सोमेश्‍वर पुसदकर यांची पक्षात मॅनेजमेंट गुरू, अशीही ओळख होती. सभा, मेळावा, प्रचार सभा असो किंवा सामाजिक कार्यक्रम तो भव्यदिव्य झाला पाहिजे, अशी व्यवस्था ते करीत होते. त्यांनी आयोजित केलेली शिवसेनाप्रमुखांची जाहीर सभा, कृषी मेळावे, हास्य कविसंमेलन, संगीत कार्यक्रम, उद्योजकांचा मेळावा हे त्यांच्या उत्कृष्ट आयोजनाची साक्ष आजही देतात. सामाजिक व साहित्य क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. विधानपरिषदेचे माजी सदस्य प्रा. बी. टी. देशमुख यांच्यासोबत विदर्भातील सिंचनाच्या अनुशेषावरील लढाई, त्यासाठी औष्णिक वीज प्रकल्पाच्या विरोधातील न्यायालयीन लढाई, शेतक-यांना अद्ययावत तंत्रज्ञान मिळावे, यासाठी कृषी मेळावे त्यांनी आयोजित करून ते यशस्वीही केले.

साहित्याच्या क्षेत्रात स्व. सुरेश भट स्मृती प्रतिष्ठान स्थापन करून नवोदित साहित्यिकांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आझाद हिंद मंडळाचा गणेशोत्सव विदर्भच नव्हे तर राज्यात नावारूपास त्यांनी आणला. गणेशोत्सवाचा मूळ हेतू प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी सदैव उतरविला.
राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक, साहित्यिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. यश पायावर लोळण घालत असताना वैयक्तिक हित बाजूला ठेवून त्यांनी यशाचा उपयोग गरजूंसाठी केला. परिवहन मंडळ, जिल्हा बॅंक, म्हाडा या विविध प्राधिकरणावर काम करताना त्यांनी गरजूंना नेहमी मदतीचा हात दिला. त्याचीच परिणीती अनेक कुटुंबे आज पोट भरत आहेत. बांधकाम क्षेत्रातही त्यांनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. तरुण उद्योजकांना या क्षेत्रात आणण्यासाठी अमरावतीत त्यांनी देशातील ख्यातनाम उद्योजकांना एका व्यासपीठावर आणण्याची किमया करून दाखविली. विदर्भातील अनेक नामवंत संस्थांसोबत त्यांची जवळीक त्यांनी नेहमी समाजासाठी खर्ची घातली. प्रत्येक टप्प्यावर यश संपादित करणा-या या शांत व संयमी व्यक्तिमत्त्वाला मात्र कर्करोगासमोर हात टेकावे लागले. फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्यांच्यावर मात केली. यासोबतच शिवसेनेतील लढवय्या पर्वाचा अस्त झाला.

शिवसेनेचा पाया अमरावतीत भक्कमपणे रोवणारे शिलेदार व जुन्या अमरावतीच्या बुधवारा येथील आझाद हिंद मंडळाचे प्रमुख पदाधिकारी सोमेश्‍वर पुसतकर यांच्या पार्थिवावर आज येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांच्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली व साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला.    (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख