संपूर्ण महाविकास आघाडी आहे शेतकरी विधेयकाच्या विरोधात : बाळासाहेब थोरात - the entire mahavikas front is against the farmers bil said balasaheb thorat | Politics Marathi News - Sarkarnama

संपूर्ण महाविकास आघाडी आहे शेतकरी विधेयकाच्या विरोधात : बाळासाहेब थोरात

रुपेश खैरी
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

या कृषी विधेयकात आधारभूत किमतीचा खेळखंडोबा झाला आहे. यात व्यापारी देतील तो भाव शेतकऱ्यांना मान्य करावा लागणार आहे. यात जर या व्यापाऱ्याने शेतकऱ्याची फसवणूक केली तर त्याचा वाली कोण, असा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. यासंदर्भात कोणीच बोलायला तयार नसल्याचे दिसून आले आहे.

वर्धा : केंद्र शासनाने आणलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांना संपविणारे आहे. ते केवळ साठेबाज आणि नफेखोरांच्या हिताचे आहे. यामुळे त्या कायद्याच्या निषेधात सेवाग्रामात हा सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे. या सत्याग्रहात केवळ काँग्रेसजन दिसल्याने तो केवळ काँग्रेसचा आहे असे समजू नये, यात आघाडीतील सहभागी मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी असल्याची माहिती काँग्रेसेच प्रदेशाध्यक्ष तथा महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिली. 

सेवाग्राम येथे काँग्रेसच्यावतीने आयोजित सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी ते आले असता ते बोलत होते. सत्याग्रह सुरू होण्यापूर्वी त्यांनी बापूकुटीत सर्वधर्म प्रार्थना केली. या प्रार्थनेनंतर ते बोलत होते. यावेळी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकास, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, आमदार रणजित कांबळे, माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
स्व. यशवंतराव चव्हाण यांनी बाजार समितीची संकल्पना आणली. ती शेतकऱ्यांकरिता लाभाची ठरली. आता केंद्र शासन ही संकल्पनाच मोडीत काढण्याच्या प्रयत्नात आहे. यात शेतकऱ्याची जर व्यापाऱ्यांकडून फसवणूक झाली तर त्याची चौकशी त्या भागाचा उपविभागीय अधिकारी करणार, असे या विधेयकात म्हटले आहे. उपविभागीय अधिकारी काय चौकशी करणार, हे सर्वांनाच माहिती आहे. या सर्वांचा निषेध नोंदविण्यासाठी हा सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे. कोविड असल्यामुळे हा सत्याग्रह मोजक्या प्रमाणात आहे. कोविड नसता तर वर्धा नगरी भरून गेली असती. यामुळे प्रत्येक जिल्ह्याला त्यांच्या स्थळी आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनानुसार सर्वत्र आंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. 

आधारभूत किमतीचा खेळखंडोबा : विजय वडेट्टीवार 
या कृषी विधेयकात आधारभूत किमतीचा खेळखंडोबा झाला आहे. यात व्यापारी देतील तो भाव शेतकऱ्यांना मान्य करावा लागणार आहे. यात जर या व्यापाऱ्याने शेतकऱ्याची फसवणूक केली तर त्याचा वाली कोण, असा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. यासंदर्भात कोणीच बोलायला तयार नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे हे कृषी विधेयक रद्द करण्याची मागणी आघाडीच्या वतीने करण्यात येत असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.   (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख