कोरोनाची भीती डॉक्टर करताहेत ‘कॅश’, एकाच चाचणीचे वेगवेगळे दर

सीटी स्कॅन (एचआरसीटी) चाचणीसाठी देशभरातील कोणत्याही महानगरात अडीच ते तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चंद्रपूर मात्र अपवाद ठरले आहे.
Corona
Corona

चंद्रपूर : जगभर कोरोनाने उच्छाद मांडला आहे. लोक रोज जीवन मरणाची लढाई लढत आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टरांकडून अपेक्षा जास्त आहेत. पण काही डॉक्टर्स मात्र लोकांमध्ये असलेली कोरोनाची भिती कॅश करण्याच्या मागे लागले आहेत. रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहेत. या संकटकाळात काही डॉक्‍टरांच्या ‘धंद्या’ला चांगलीच पालवी फुटली आहे. कोरोनाच्या आधी आणि आत्ताच्या सिटी स्कॅनच्या दरांत तब्बल तीनपटीने वाढ केली आहे. शहरात तीन डॉक्‍टरांकडे सिटी स्कॅनची व्यवस्था आहे. एकाच चाचणीसाठी तिघांचेही दर वेगवेगळे आहेत. 

जिल्ह्यात डॉ. रवी अल्लुरवार, डॉ. अनिल माडुरवार आणि डॉ. अजय मेहरा यांच्याकडे सीटीस्कॅनची व्यवस्था आहे. या तिघांचीही खासगी रुग्णालये शहरात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू आहे. सहा हजारांवर रुग्णसंख्या गेली आहे. कोरोनाच्या संसर्गात सर्दी, ताप, खोकला, अशी लक्षण सुरुवातीला आढळतात. त्यानंतर संसर्ग फुप्फुसापर्यंत पोहोचतो. त्यामुळे अशा रुग्णांना सिटी स्कॅन (एचआरसीटी टेस्ट) करण्याचे डॉक्‍टर सुचवितात. सध्या या तिघांच्याही रुग्णालयात पाय ठेवायला जागा नाही. कोरोना बाधित आणि संशयितांच्या रांगा लागल्या आहेत. यापार्श्‍वभूमीवर आता कोरोनाच्या संकटाला संधीत रूपांतरित करण्याचा गोरखधंदा या डॉक्‍टरांनी सुरू केला. कोरोनाबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. याच भीतीचा वापर रुग्णांकडून जादा शुल्क उकळण्यासाठी केला जात आहे. 

डॉ. अनिल माडुरवार इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष आहेत. डॉक्‍टरांवरील अन्याय आणि वैद्यकीय क्षेत्रातील चुकीच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी त्यांची आहे. परंतु डॉ. माडुरवार यांनीच सीटीस्कॅनच्या दरात सहा हजार रुपयांपर्यंत वाढ केली. जटपुरागेट परिसरात डॉ. रवी अल्लूरवार यांचे हॉस्पिटल आहे. ते रुग्णांकडून चक्क आठ हजार रुपये सीटीस्कॅनचे घेत आहेत. नागपूर मार्गावरील डॉ. अजय मेहरा रुग्णांकडून पाच हजार रुपये वसूल करीत आहेत. एकाच चाचणीसाठी शहरात तिघेजण वेगवेगळे दर आकारत आहे. मात्र, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलीही कायदेशीर तरतूद नाही. डॉक्‍टरांनी एकत्र बसून दर ठरवावे. कुणी तक्रार केली तर कारवाई करू, असे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे यांनी सांगितले. यासंदर्भात डॉ. अल्लूरवार आणि डॉ. मेहरा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. डॉ. माडुरवार यांनी फक्त पाचशे रुपयांची वाढ केल्याचे सांगितले. 
 
खाताहेत कोरोना रुग्णांच्या टाळूवरील लोणी 
सीटी स्कॅन (एचआरसीटी) चाचणीसाठी देशभरातील कोणत्याही महानगरात अडीच ते तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चंद्रपूर मात्र अपवाद ठरले आहे. दरम्यान, आजच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खासगी रुग्णालयातील सिटी स्कॅनच्या दर निश्‍चितीसाठी समिती गठीत करणार, असे सांगितले. समिती नेमकी कधी गठीत होईल, हे जाहीर केले नाही. तोपर्यंत या डॉक्‍टरांकडून कोरोना रुग्णांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार सुरूच राहणार आहे. कोरोनात रुग्णांची संख्या वाढली. खर्च वाढला आहे. अतिरिक्त मनुष्यबळ आणि सुरक्षेच्या साधनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे दर वाढले असतील, या शब्दांत रेडीओलॉजिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. आर. एन. भलमे यांनी सांगून दरवाढीची पाठराखण केली. 

एचआरसीटी टेस्टचे दर 
डॉ. रवी अल्लुरवार: आठ हजार 
डॉ. अनिल माडुरवार: सहा हजार 
डॉ. अजय मेहरा: पाच हजार
(Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com