२० वर्षांपासूनचा होता भाजपचा गढ, तेथे उगवला कॉंग्रेसचा ‘विकास’ - bjps stronghold for twenty years congress vikas grew there | Politics Marathi News - Sarkarnama

२० वर्षांपासूनचा होता भाजपचा गढ, तेथे उगवला कॉंग्रेसचा ‘विकास’

अतुल मेहेरे
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे विधानसभेतही भाजपच्याच उमेदवाराला जनता निवडून आणेल, असा अंदाज सर्वांचाच होता. पण विकास ठाकरे यांनी सर्वांचे अंदाज फोल ठरवत २० वर्षांपासून असलेल्या भाजपच्या गडावर कॉंग्रेसचे झेंडा फडकवला.

नागपूर : नागपूर पश्‍चिम विधानसभा मतदार संघावर भारतीय जनता पक्षाचे २० वर्षांपासून वर्चस्व होते. मात्र गेल्या वर्षी २०१९ मध्ये तेथे अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात तेव्हाचे विद्यमान आमदार सुधाकर देशमुख यांचा पराभव करून कॉंग्रेसचे तरुण उमेदवार विकास ठाकरे हे आमदार झाले. मतमोजणीच्या १६ व्या फेरीला ठाकरे धास्तावले होते, पण त्यानंतर पुन्हा आघाडी घेत त्यांनी कॉंग्रेसचा झेंडा भाजपच्या गडावर फडकवला.  

मतमोजणीच्या १६व्या फेरीनंतर समर्थक, कार्यकर्त्यांचे अभिनंदनासाठी फोन येणे त्यांना सुरू झाले होते. पण तेव्हा त्यांनी कुणाचेही अभिनंदन स्वीकारले नाही, तर निकाल पूर्ण हाती येऊ द्या, सबुरी ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला होता. नागपूर पश्‍चिम मतदारसंघात मतमोजणीच्या सुरुवातीपासून चुरस निर्माण झाली होती. निकालाअंती ठाकरे यांना ८३,२५२ आणि देशमुख यांना ७६,८८५ मते पडली होती. भाजपचे तत्कालीन आमदार सुधाकर देशमुख २०१४ मध्ये मोदी लाटेत निवडून आले होते आणि त्या पाच वर्षांत एके काळी नागपूरचे लोकप्रिय आमदार राहिलेले विकास ठाकरे यांनी संपूर्ण पाच वर्ष मतदार संघातील नागरिक आणि कार्यकर्त्यांसोबत जुळून राहिले. त्याचे फळ त्यांना गेल्या वर्षी २०१९ मध्ये मिळाले. 

मतमोजणीच्या सुरुवातीला देशमुखांनी ६०२ मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह पसरला होता. पण दुसऱ्याच फेरीत विकास ठाकरे ७७८ मतांची आघाडी घेतली. तरीही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक कायमच होती. तिसऱ्या फेरीत पुन्हा ठाकरेंनी मोठी आघाडी घेतली. देशमुखांपेक्षा त्यांना ३१५४ मते जास्त मिळाली. त्यानंतर चौथ्या फेरीत १४०७, पाचव्या १११८, सातव्या फेरीत ५७७ मतांचा आघाडी ठाकरेंनी घेतली. आठव्या फेरीत देशमुख १४२ मतांनी पुढे गेले. त्यानंतर नवव्या आणि दहाव्या फेरीत पुन्हा ठाकरे पुढे निघाले, तर ११, १२ व १३ व्या फेरीत देशमुखांना ठाकरेंना मागे टाकले. फेरीगणिक निकाल पुढे आणखी रोमांचक होत गेले. 

१४व्या फेरीला ठाकरे आणि १५ व १६व्या फेरीला देशमुख आणि त्यानंतर १७व्या फेरीला पुन्हा विकास ठाकरेंनी आघाडी घेतली. मतांमधील चढउतार कायम राहिला, पण सुरूवातीलाच ठाकरेंची स्थिती मजबूत झालेली होती. त्यामुळे त्यांची लीड घसरलीच नाही आणि ६३६७ मतांनी विकास ठाकरे यांना विजयी घोषित करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे विधानसभेतही भाजपच्याच उमेदवाराला जनता निवडून आणेल, असा अंदाज सर्वांचाच होता. पण विकास ठाकरे यांनी सर्वांचे अंदाज फोल ठरवत २० वर्षांपासून असलेल्या भाजपच्या गडावर कॉंग्रेसचे झेंडा फडकवला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख