जामीन मिळाला, उच्च न्यायालयात दाद मागणार : ॲड. यशोमती ठाकूर - bail granted will appeal to High Court said ad yashomati thakur | Politics Marathi News - Sarkarnama

जामीन मिळाला, उच्च न्यायालयात दाद मागणार : ॲड. यशोमती ठाकूर

अतुल मेहेरे
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

न्यायालयाचा निर्णय आम्ही आदराने स्वीकारला आहे. पण त्या प्रकरणात आम्ही निर्दोष आहोत. त्यामुळे न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहोत.

नागपूर : आज अमरावती न्यायालयाने एका प्रकरणात आम्हाला तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. पण या निकालानंतर लगेच आम्हाला जामीनही मंजूर करण्यात आलेला आहे. या प्रकरणी आम्ही निर्दोष आहोत. त्यामुळे न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार आहोत, असे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले. 

अमरावतीच्या अंबादेवी मंदिराजवळ पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात अमरावती न्यायालयाने ॲड. यशोमती ठाकूर यांच्यासह तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. सन २०१२ ची ही घटना आहे. वाहतूक पोलिस कर्मचारी रौराळे यांनी तेव्हाच्या आमदार आणि विद्यमान महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना गाडी पुढे नेण्यास मज्जाव केला होता. त्यांचा वाहनचालक आणि कार्यकर्त्यांची पोलिस कर्मचाऱ्यासोबत बाचाबाचीही झाली होती. दरम्यान ॲड. ठाकूर यांनी गाडीतून उतरून रस्त्यावरच रौराळे यांना थापड मारली होती. 

त्यानंतर वाहतूक पोलिस कर्मचारी रौराळे यांनी पोलिस ठाण्यात ॲड. ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर आज त्याचा निकाल लागला. यामध्ये ॲड. ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना तीन महिन्याची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर ‘सरकारनामा’ला प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, न्यायालयाचा निर्णय आम्ही आदराने स्वीकारला आहे. पण त्या प्रकरणात आम्ही निर्दोष आहोत. त्यामुळे न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहोत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख