अमरावती-पुणे एसटी धावणार, पण विनावातानुकूलित - amravati pune st will run but non air conditioned | Politics Marathi News - Sarkarnama

अमरावती-पुणे एसटी धावणार, पण विनावातानुकूलित

सुरेंद्र चापोरकर
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

अमरावती आगारातून चालणाऱ्या एकूण गाड्यांपैकी एक तृतीयांश गाड्या आता सुरू झाल्या असून ग्रामीण भागातसुद्धा या गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजवर ठप्प असलेले उत्पन्न आता हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली असून सद्यःस्थितीत सात ते आठ लाखांचे उत्पन्न एसटी महामंडळाला होत आहे.

अमरावती : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या पाच महिन्यांपासून ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या एसटीची चाके थांबलेली होती. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. सामान्य जनतेची अनेक कामे अडून पडली होती. पण एसटी सुरू होताच लोकांची पावले एसटी बसकडे वळली. ग्रामीण भागांतील फेऱ्या सुरू केल्यानंतर अमरावती-पुणे ही लांब पल्ल्याची बससुद्धा येत्या रविवारपासून सुरू होणार आहे. मात्र कोरोनाचा धोका कायम असल्याने ही बस विनावातानुकूलित असणार आहे. 

अमरावती-पुणे ही गाडी पूर्वी शिवशाही वातानुकूलित होती. परंतु कोरोनामुळे एसी गाडी चालविता येत नसल्याने ही गाडी आता वातानुकूलित राहणार नाही. अमरावती-औरंगाबाद हे भाडे 610 रुपये राहणार असून ज्येष्ठांसाठी अमरावती-पुणेचे भाडे 1,025 रुपये राहील. या गाडीच्या आरक्षणाला सुरुवात झाली असून नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमरावतीचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी केले आहे. 
विशेष म्हणजे, आठ दिवसांतच एसटी महामंडळाच्या बसेसने चांगलाच वेग घेतला असून अनेक मार्गांवर प्रवाशांनीसुद्धा उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेसवर सर्वसामान्य नागरिकांचा असलेले विश्‍वास परत एकदा अधोरेखित झाला आहे. 

अमरावती आगारातून चालणाऱ्या एकूण गाड्यांपैकी एक तृतीयांश गाड्या आता सुरू झाल्या असून ग्रामीण भागातसुद्धा या गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजवर ठप्प असलेले उत्पन्न आता हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली असून सद्यःस्थितीत सात ते आठ लाखांचे उत्पन्न एसटी महामंडळाला होत आहे. हे उत्पन्न चौपट व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
एसटी महामंडळाच्या बसेसचा प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाबाबत सर्व काळजी आम्ही घेत आहोत. येत्या काही दिवसांत सर्वच मार्गांवरील वाहतूक नेहमीप्रमाणे होईल, अशी आशा असल्याचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख