यशोमती ठाकूर यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट करणारा कृषी पर्यवेक्षक निलंबित - agriculture supervisor suspended for making defamatory posts about yashomati thakur | Politics Marathi News - Sarkarnama

यशोमती ठाकूर यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट करणारा कृषी पर्यवेक्षक निलंबित

प्रतीक मालवीय 
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

यशोमती ठाकूर यांच्या विरोधात आपत्तीजनक संदेश व्हायरल करणा-या शासकीय अधिका-यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी कार्यकर्त्यांची होती. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत धारणी पोलिस ठाणे तथा अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

धारणी (जि. अमरावती) : सोशल मीडियाच्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात धारणी येथील एका कृषी पर्यवेक्षकाने विवादास्पद पोस्ट टाकल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी या घटनेवरून आक्रमक झाले असून त्यांनी धारणी व अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्यात संबंधित कृषी अधिका-यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार आवाज प्रहार नामक एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मंगळवारी धारणी कृषी कार्यालयात कार्यरत असणारे कृषी पर्यवेक्षक अरुण बेठेकर यांनी एक पोस्ट केली. त्यात मेळघाटातील आदिवासी बांधवांवर पालकमंत्र्यांकडून अन्याय केला जात असल्याचे म्हटले होते. या व्हॉट्सअ‍ॅप मॅसेजला मेळघाटसोबत जिल्ह्याच्या अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला. तसेच याबाबत सर्वांनी नाराजी व्यक्त केली होती. 

दरम्यान, यशोमती ठाकूर यांच्या विरोधात आपत्तीजनक संदेश व्हायरल करणा-या शासकीय अधिका-यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी कार्यकर्त्यांची होती. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत धारणी पोलिस ठाणे तथा अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. यासंदर्भात कारवाई होऊन सदर कृषी पर्यवेक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. 

मी तो मॅसेज फॉर्वड केलेला नाही. कुटुंबातील लहान मुलांकडून मॅसेज पाठविल्या गेला असावा, मी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा आदर करतो. मी एक शासकीय कर्मचारी असल्याने असा मॅसेज कसा पाठवेल? झालेल्या चुकीबद्दल मी जाहीर माफी मागण्यास तयार आहे. 
- अरुण बेठेकर 
कृषी पर्यवेक्षक, धारणी.
(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख