अठरापगड जमातीचा विचार करतो, धमक्या मिळत आहेत, पण भिणार नाही : विजय वडेट्टीवार - we think of the all tribe receiving threats but not afraid sade vijay wadettiwar | Politics Marathi News - Sarkarnama

अठरापगड जमातीचा विचार करतो, धमक्या मिळत आहेत, पण भिणार नाही : विजय वडेट्टीवार

संजय तुमराम
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

गेल्या तीन वर्षांपासून ओबीसी प्रवर्गाच्या समाजातील लोकांची भरती होत नाहीये. परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. मुलांचे नोकरीचे आणि लग्नाचे वय निघून जात आहे. ही परिस्थिती समजून मराठा समाजाच्या काही युवकही माझ्याशी फोनवर बोलले आहेत. या युवकांच्या मनातील भावना मी मांडल्या आहेत. हे मांडताना मला भिती वाटत नाही.

नागपूर : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे ओबीसींच्या मुद्यावर काहीच्या काही वक्तव्य करीत आहेत. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये फूट पाडून सरकार चालवण्यचा यांचा केविलवाणा प्रयत्न आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केला. त्यावर या संदर्भात मला धमक्या मिळत आहेत, पाहून घेण्याची भाषा बोलली जात आहे. पण मी जिवाला भित नाही. जे व्हायचे ते होवो, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

मराठा व ओबीसी समाजांमध्ये दुफळी निर्माण करीत असल्याच्या चंद्रकांत पाटलांच्या आरोपाचा वडेट्टीवार यांनी साफ इन्कार केला. वडेट्टीवार म्हणाले, आम्ही अठरापगड जमातीच्या वेदनांचा विचार करतो. यासंदर्भात धमक्या मिळत असल्या तरी मी जीवाला भीत नाही, जे व्हायचे ते होवो, अशी टोकाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. माझ्या समाजाला आरक्षण मिळल्याखेरीज भरती होऊ देणार नाही, हा काहींचा द्वेष्टेपणा आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. मी वारसा हक्काने राजकारणात आलो नसल्याचा टोला त्यांनी कुणाचे नाव न घेता लगावला.

मराठा आरक्षणाचा विषय सध्या न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत मराठ्यांचे १२ टक्के आरक्षण बाजुला ओबीसींची नोकर भरती करुन घ्यावी, अशी भूमिका ओबीसी महासंघाची आहे. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन तशी मागणी रेटून धरली आहे. त्यावर माझ्यासाठी मंत्रीपद महत्वाचे नसून ओबीसी समाज महत्वाचा आहे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली आहे. 

गेल्या तीन वर्षांपासून ओबीसी प्रवर्गाच्या समाजातील लोकांची भरती होत नाहीये. परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. मुलांचे नोकरीचे आणि लग्नाचे वय निघून जात आहे. ही परिस्थिती समजून मराठा समाजाच्या काही युवकही माझ्याशी फोनवर बोलले आहेत. या युवकांच्या मनातील भावना मी मांडल्या आहेत. हे मांडताना मला भिती वाटत नाही. कारण मी सत्य बाजू मांडतो आहे. संघर्ष करून आम्ही येथपर्यंत आलो आहोत. त्यामुळे कितीही धमक्या आल्या तरीही मागे हटणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.     (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख