लॉकडाऊनमध्ये महापौरांनी मिळवला नवा लूक आणि फिटनेस  - in the lockdown the mayor got a new look and fitness | Politics Marathi News - Sarkarnama

लॉकडाऊनमध्ये महापौरांनी मिळवला नवा लूक आणि फिटनेस 

अतुल मेहेरे 
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

कोरोनाने आपल्याला नवीन जीवनशैली शिकवली आहे. या काळात जे कुणी घरी होते, वर्क फ्रॉम होम करीत होते, अशा सर्वांच्याच आयुष्यात काही ना काही बदल घडून आले आहेत. कोरोनाने आपल्याला जगण्यासाठीच्या गरजा आणि मर्यादा शिकविल्या आहेत. स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षा शिकविली आहे.

नागपूर : मार्च महिन्यात कोरोनाने उपराजधानीत शिरकाव केला. त्यानंतर शहरात लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमध्ये अनेकांनी आपली जीवनशैली बदलविली, फिटनेस वाढविला आणखी काही नवे प्रयोग केले. या काळात स्वतःवर नवनवे प्रयोग करण्याचा मोह महापौर संदीप जोशी यांनाही आवरला नाही. या काळात स्वतःवर निरनिराळे प्रयोग करून त्यांनी नवा लूक आणि फिटनेस मिळवला आणि हा लूक आता आपण कायम ठेवणार असल्याचे त्यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले. 

महापौर जोशी म्हणाले, लॉकडाऊनमध्ये सलून बंद होते आणि दाढी थोडी जास्त वाढली की घरी करता येत नाही. घरी एक ट्रीमर होते, त्यामुळे मग काही दिवस ट्रिमिंग केले. पण पाहिजे तसे ते जमत नव्हते. मग नंतर असं वाटलं की आता काही पर्याय नाही, दाढी वाढवली पाहिजे. मग दाढी वाढवली. दाढी पांढरी असल्यामुळे कलर करण्याचा विचार केला. पण मुलं म्हणाले, ‘बाबा, आता दाढी किंवा केस काळे करण्याचा जमाना नाही. त्यामुळे कलर करू नका.’ त्यामुळे दाढी तशीच वाढू दिली आणि लॉकडाऊन उघडल्यानंतर सलूनमध्ये जाऊन व्यवस्थित सेट केली. हा लूक मला, घरच्यांना आणि सर्व सहकाऱ्यांना आवडला. त्यामुळे आता यात बदल करणार नाही. हा माझा परमनन्ट लूक असणार आहे. 

फिटनेस बाबत महापौर म्हणाले, मला मधुमेह आहे आणि कोरोनाच्या या स्थितीत मधुमेही हायरिस्कमध्ये येतात. त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योग, प्राणायाम आणि जीम केला पाहिजे, असे वाटले. यासाठी वर अडगळीत असलेल्या खोलीचा वापर करण्याचे ठरवले. त्या दिवसापासून मी सकाळी ५.३० वाजता उठणे सुरू केले. योगासन, प्राणायाम करणे सुरू केले. आताशा ती माझी सवय बनली आहे. या काळात सर्व जीम बंद होते. त्यामुळे मित्राच्या जिममधून एक-एक करून तीन-चार साहित्य आणले आणि मग जिमही सुरू केला. या सर्वांचा फायदा मला झाला. 

पूर्वी कधी फार जीम वगैरेंच्या भानगडीत पडलो नव्हतो, पण कोरोनाच्या लॉकडाऊनने मला नव्या लुकसोबतच फिटनेस शिकवला. विशेष सांगायचे म्हणजे, या काळात शहरभर फिरून, सतत बैठका आणि काम करुनही मला साधा ताप, खोकलाही झाला नाही. नियमित व्यायाम केल्याने नव्या ऊर्जेचा संचार झाल्याचा अनुभव मी घेतो आहे. कोरोनाशी लढताना प्रत्येकाने नियमित योगासन, प्राणायाम आणि इतर व्यायाम करून स्वतःला फिट ठेवले पाहिजे, असा मोलाचा सल्लाही महापौरांनी दिला. 

कोरोनाने आपल्याला नवीन जीवनशैली शिकवली आहे. या काळात जे कुणी घरी होते, वर्क फ्रॉम होम करीत होते, अशा सर्वांच्याच आयुष्यात काही ना काही बदल घडून आले आहेत. कोरोनाने आपल्याला जगण्यासाठीच्या गरजा आणि मर्यादा शिकविल्या आहेत. स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षा शिकविली आहे. कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही, मात्र काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे, असेही महापौर संदीप जोशी म्हणाले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख