The market capture is due to the pro-China policy of the Congress | Sarkarnama

कॉंग्रेसच्या चीन धार्जिण्या धोरणामुळेच बाजारपठेवर कब्जा..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 जून 2020

चीनी वस्तूंचा बहिष्कार म्हणून भाजपचे कार्यकर्ते त्यांची होळी करत आहेत, तर कॉंग्रेसने त्यावरूनही टिका सुरू केली आहे. मग हे चीन धार्जीने नाहीत का? आज भारतच्या बाजारपेठेवर चीनचा जो कब्जा आहे, ते देखील कॉंग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळेच.

औरंगाबादः चीनमध्ये होळी, रक्षाबंधन, दिवाळी हे सण कधीही साजर केले जात नाहीत. तरी देखील भारतात चीनमधून रंग, फटाके, राख्या विक्रीसाठी येतात. याला कॉंग्रेसचे त्याकाळातील चीन धार्जीणे धोरणच जबाबदार आहे. त्यामुळेच आज भारतीय बाजारपेठेवर चीनचा कब्जा असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. चीनी वस्तू जाळून आंदोलन करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांवर कॉंग्रेस टीका करते, यातूनच त्याचे चीन धार्जीणे धोरण दिसून येते, अशी टिकाही दानवे यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील आपल्या जनसंवाद कार्यक्रमात केली.

व्हर्च्युल रॅली अंतर्गत रावसाहेब दानवे यांनी आज चिखली विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी, व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत-चीन सीमेवरील तणाव, कोरोनाच्या संकटात केंद्र सरकारने जाहीर केलेले पॅकेज, अन्नधान्याचा केलेला पुरवठा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले धाडसी निर्णय व गोरगरीबांसाठी आखलेल्या योजनांचा दाखला देत, राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला.

आपल्या अर्ध्या तासाच्या संवादामध्ये रावसाहेब दानवे म्हणाले, भारत आणि चीन या दोन देशांच्या सैनिकांमध्ये सीमेवर जी चकमक झडली, त्यावरून कॉंग्रेस आमच्यावर टिका करत आहे. पण १९६२ च्या युध्दवेळी तुम्ही काय केले होते, ते एकदा तपासून बघा. त्यावेळी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचेच हे परिणाम आहेत. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा कठीण प्रसंगात देखील धाडसी निर्णय घेत आपल्या सैन्याला अधिकार देऊन टाकले आहेत. सीमेवर जशी परिस्थिती उद्भवेल त्या पध्दतीने ती हाताळा, अशी मोकळीक या आधी आपल्या जवानांना कधी देण्यात आली नव्हती.

चीनी वस्तूंचा बहिष्कार म्हणून भाजपचे कार्यकर्ते त्यांची होळी करत आहेत, तर कॉंग्रेसने त्यावरूनही टिका सुरू केली आहे. मग हे चीन धार्जीने नाहीत का? आज भारतच्या बाजारपेठेवर चीनचा जो कब्जा आहे, ते देखील कॉंग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळेच. आपल्या देशातील होळी, दिवाळी, रक्षाबंधन हे सण चीनमध्ये कधीही साजरे केले जात नाही. पण त्यांनी आपल्या देशात येऊन येथील सण, उत्सवाचा अभ्यास केला.  चीनमध्ये जाऊन त्याचे उत्पादन केले आणि त्याच वस्तू ते आपल्याला विकत आहेत. हे कॉंग्रेसच्या चीन धार्जिण्या धोरणामुळेच अशी टिका देखील दानवे यांनी केली.

राज्य सरकारने एक दमडाही दिला नाही..

कोरोनाच्या संकटातून गोरगरिबांना बोहर काढून देशाची परिस्थिती पुर्व पदावर आणण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने अनेक पॅकेज जाहीर केले. उद्योग, कृषी, कामगार या सगळ्याच क्षेत्राला त्याचा लाभ मिळत आहे. देशातील इतर राज्यांनी केंद्राच्या पॅकेज व्यतिरिक्त आपल्या बजेटमधून देखील लोकांना पॅकेज देत मदत केली आहे. पण महाराष्ट्रातील सरकारने अद्याप जनतेसाठी एक दमडाही दिलेला नाही. एवढेच काय पण गोरगरिबांसाठी केंद्राने तीन महिन्याचे धान्य एकाचवेळी दिल्यानंतर ते वाटप करण्याची तसदी देखील राज्य सरकार घेत नाहीये. दर महिन्याला धान्य वाटप करत ते कोरोनाच्या संकटातही लोकांना घराबाहेर आणत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

गहु, तांदूळ या बरोबरच दाळ देण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला, पण राज्य सरकारने ही दाळ घेण्याची तयारी देखील दाखवली नाही. कापूस आणि मका खरेदीच्या बाबतीत देखील या सरकारने हात आखडता घेतला. विशेष म्हणजे खरेदीसाठीचा सगळा पैसा हा केंद्र सरकार देणार आहे. राज्यांना फक्त  शेतकऱ्यांकडून कापूस, मका खरेदी करायची आहे, पण ते देखील राज्य सरकार करायला तयार नाही. नुकतेच राज्य सरकारने एक पत्रक काढून मका खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारवर केवळ टिका करायची आणि स्वतः मात्र कुठलेच निर्णय घ्यायचे नाही, हे योग्य नसल्याचे दानवे म्हणाले.

केंद्रातील मोदी सरकारने जम्मू कश्मिरमधून कलम ३७०, ३५ अ हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. गेली अनेक वर्ष देशात रखडलेला राम मंदिराचा प्रश्न कुठलाही वाद किंवा सामाजितक तेढ निर्माण न होऊ देता मार्गी लावला, आता आयोध्येत राम मंदिर उभारले जाणार आहे. मुस्लिम महिलांसाठी तीन तलाक, देशातील नागरिकत्वासाठी एनआरसी, सीएए सारखे धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद मोदी यांनी घेतले. जागतिक पातळीवर देखील आपल्या देशाचा मान वाढला. कोरोनाच्या संकटाचा धोका वेळीच ओळखून योग्य पावले उचलल्यामुळेच जगातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारतात कोरोनामुळे होणारी हानी आपल्याला टाळता आली असा दावा देखील दानवे यांनी आपल्या भाषणात केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख