गावातील गुंडगिरीला वैतागून एक शिक्षक राजकारणात आला आणि आमदारही झाला...

दाळू गुरूजींमधला कलावंत आणि खेळाडू कधी थांबला नाही. सन १९७०-७१ मध्ये त्यांनी केलेल्या नाटकात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला होता. ते उत्कृष्ट कबड्डीपटू आहेत. ज्या हनुमान मंडळाकडून ते कबड्डी खेळत त्या मंडळाने १३ राज्यस्तरीय आणि एक राष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे.
Dalu Guruji Akola
Dalu Guruji Akola

नागपूर : अकोला जिल्ह्यातील सुकळी या छोट्याशा गावात राहणारे दाळू गुरूजी दहीहांडा गावात विदर्भ शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षक होते. शिक्षकी पेशात त्यांचे काम उत्तम चालले होते. पण त्यांच्या गावात गुंडगिरी फोफावू लागली होती. गुंडांच्या टारगेटवर महिला, मुली होत्या. १९८५ ते १९९० चा तो काळ होता. शिवसेना जबरदस्त फार्मात होती. गुंडांमुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांना त्यांच्या जाचातून सोडवायचे म्हणून आक्रमक असलेल्या गुरूजींनी शिवसेनेत प्रवेश केला आणि पाहता-पाहता गुंडगिरीचा खातमा केला. त्यांचा आक्रमक स्वभाव पाहता पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली आणि १९९० मध्ये ते शिवसेनेचे आमदार झाले. 

नाही खडू, फळा; चढले विधानसभेचा माळा
आमदार म्हणून निवडून आल्यावर ‘आता नाही खडू आणि फळा, चढले विधानसभेचा माळा’, असे म्हणत शाळेच्या सर्व सहकाऱ्यानी आणि संचालकांनी त्यांना निरोप दिला. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करीत असलेल्या शिवसेनेत गुरूजी चांगलेच रमले आणि उम्मेदीने काम करू लागले. आमदारकीचे एक-दीड वर्ष काम केल्यानंतर शिवसेनेतील त्यांचे नेते छगन भुजबळ यांचे सेनेत पटेनासे झाले. त्यांनी सेना सोडली आणि त्यांच्या सोबत गुरूजीही आक्रमक सेना सोडून मुरब्बी कॉंग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात त्यांनी मतदारसंघात भरपूर कामे केली. पण नंतर १९९५ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचे तोंड बघावे लागले. पराभूत झाल्यानंतर त्यांनी पुन्हा शाळेत जाणे सुरू केले. पण लोकं त्यांच्याकडे विविध कामे घेऊन यायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपण पूर्ण वेळ देऊ शकत नाही. त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर सन १९९८-९९ मध्ये ते पुन्हा शिवसेनेत आले. सध्याही शिवसैनिक म्हणून ते काम करताहेत. 

झाशीच्या तुरूंगात होते १३ दिवस
दाळू गुरूजींनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा राम मंदिराचा लढा जोरात सुरू होता. कारसेवकांमध्ये गुरूजीही होते. तेव्हा झाशीच्या तुरूंगात १३ दिवस त्यांना डांबले होते. त्यानंतर रामशिला पूजन समितीचे ते जिल्हाध्यक्ष होते. राममंदिरासाठी विटा संकलित करण्याचे काम त्यांनी जिल्हाभरात प्रभावीपणे केले होते. 

नाट्य कलावंत आणि उत्कृष्ट कबड्डीपटू
दाळू गुरूजींमधला कलावंत आणि खेळाडू कधी थांबला नाही. सन १९७०-७१ मध्ये त्यांनी केलेल्या नाटकात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला होता. ते उत्कृष्ट कबड्डीपटू आहेत. ज्या हनुमान मंडळाकडून ते कबड्डी खेळत त्या मंडळाने १३ राज्यस्तरीय आणि एक राष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे. खेळण्यावरच ते थांबले नाहीत, तर गेल्या २८ वर्षांपासून ते राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करतात. दोन वर्षांतून एकदा ही स्पर्धा होते. यासाठी त्यांनी समाजसहभागातून केळीवेली येथे एक स्टेडियम तयार केले आहे. आजही कबड्डीपटू घडवण्याचे कार्य ते करीत आहेत. शिक्षक - समाजसेवक - आमदार आणि पुन्हा समाजसेवक असा दाळू गुरुजींचा आजवरचा प्रवास राहीला आहे. आज शिक्षक दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com