कोरोना इफेक्ट : ...ही तर खाकी वर्दीच्या यातनांची यात्रा!

रस्त्यावर कर्तव्यावर असताना पोलिस कोरोनाबाधित होत आहे. खाकी वर्दीतील माणूस बाधित होतो, दगावत आहे, ही गृहखात्यासाठी चिंताजनक बाब आहे. परंतु, कर्तव्यात कसूर करीत नाही. आतापर्यंत राज्यात 150 पेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर 7 जणांचा मृत्यू झाला.
police
police

नागपूर : ऊन, वारा, पाऊस, वादळ असो किंवा सण खाकी वर्दीतील पोलिस नेहमीच बंदोबस्तासाठी तत्पर असतात. सणासुदीला एक दिवसाचा बंदोबस्त, तर गणेशोत्सवातील 10 दिवसांचा बंदोबस्त. निवडणुकीतील मर्यादित काळासाठी बंदोबस्त पोलिसांच्या पाचवाली पुजलेला आहे. मात्र, कोरोना विषाणूशी पोलिसांचा काडीचाही संबंध नाही. मात्र, देशात लॉकडाउन झाले आणि बंदोबस्तासाठी पोलिसांना ऑर्डर दिला. एक दोन तीन नाही तर तब्बल 52 दिवसांचा बंदोबस्त म्हणजे पोलिसांच्या आयुष्यातील ही यातनांची यात्राच आहे. बंदोबस्तादरम्यान राज्यात 7 पोलिसांना "कोरोना'शी लढताना आहुती द्यावी लागली. तरी हातात काठी घेऊन कर्तव्यात कसूर करत नाही. 

कधी कोण कोरोनाबाधित असेल हे खाकीला माहिती नाही. मात्र, रस्त्यावर हातात काठी घेऊन नाकाबंदी करणे, येणाऱ्या प्रत्येकाला थांबवणे, कुठे जाता, कशासाठी जाता, असे संवाद साधत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांनी वारंवार घरून निघू नका, संचारबंदी आहे, असे तेच तेच सांगणे नाकीनऊ आणणारे ठरते. मात्र, नेहमीच डोक्‍यात आग घेऊन मिरवणाऱ्या पोलिसांचा नागरिकांशी संवाद साधताना संयम दिसून येत होता. रात्रीची गस्त घालण्यापासून तर चौकात चौफेर संचारबंदीसाठी तैनात पोलिसांचा राग अनावर झाला की, उल्लंघन करणाऱ्यांना दोनचार लगावण्यापासून गुलाबाचे फूल देऊन त्याला लाजवण्याचे आणि रस्त्यात नाचवण्याचे प्रकार करून रागावर नियंत्रण मिळवण्याचे काम पोलिसांनी केले, मात्र नागरिकांना मारहाण केली नाही. कोरोनाच्या या युद्धात जसा डॉक्‍टर रुग्णांशी सेवेतून लढतो त्याच धर्तीवर खाकी लढत आहे. 

दीडशे पोलिस कोरोनाबाधित 
रस्त्यावर कर्तव्यावर असताना पोलिस कोरोनाबाधित होत आहे. खाकी वर्दीतील माणूस बाधित होतो, दगावत आहे, ही गृहखात्यासाठी चिंताजनक बाब आहे. परंतु, कर्तव्यात कसूर करीत नाही. आतापर्यंत राज्यात 150 पेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर 7 जणांचा मृत्यू झाला. 

बंदोबस्तामुळे अस्पृश्‍य 
लॉकडाउनच्या 52 दिवसांच्या बंदोबस्तामध्ये पोलिस रस्त्यावर तैनात असताना कोण कोरोनाबाधित असेल हे सांगता येत नाही. यामुळे घरी गेल्यावर तो बाबा म्हणत अंगावर धावून येणाऱ्या लेकराला छातीशी कवटाळू शकत नाही. कितीतरी पोलिसांनी स्वतःला विलगीकरणात टाकले. जणू या कोरोनाच्या बंदोबस्तात पोलिसाने आपल्या कुटुंबासाठी स्वतःला अस्पृश्‍य करून घेतल्याचे चित्र आहे. 

संसाधनाशिवाय लढणारा कोरोना योद्धा 
बंदोबस्ताच्या स्थळी पोलिसांकडे हॅंडग्लोज, हेडशिल्ड, सॅनिटायझर, मास्क, किट अशी कोणतीच संसाधने पुरेशी नाही. यामुळे तोंडावर मास्कऐवजी खिशात असलेला रुमाल बांधतो. यातूनच कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण पोलिसांमध्ये वाढले आहे, परंतु सेनापती एसीत आणि सैनिक रणांगणात, अशी अवस्था आहे. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात आता मजुरांना घरी सोडण्यासाठी नवा प्रशासकीय कामाचा बोझा त्यांच्यावर आला. एकीकडे हा कामाचा अतिरिक्त बोझा तर कौटुंबिक समस्या, आरोग्याच्या समस्यांशीदेखील पोलिस लढत आहे. यात पोलिसांची मानसिक स्थिती बिघडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

वाढत्या लॉकडाउनमुळे मानसिक खच्चीकरण 
खाकी वर्दीतील आई-बाप घरी आल्यानंतर चिमुकल्यांकडे नजर जातात डोळे पाणावतात. या कोरोनाच्या संकटामुळे मुलांना वेळ देता येत नाही. बंदोबस्तासाठी रवाना होताना चिमुकल्यांकडे बघताना डोळे भरून येतात, या प्रतिक्रिया महिला पोलिसांच्या आहेत. तर वाढत्या लॉकडाउनमुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. आता नागरिकांना रस्त्यावर निघू नका, असे समजावून खाकी वर्दी थकलेल्या अवस्थेला पोहोचली आहे. या पोलिसांचा देह क्षीण झाला. मात्र, 52 दिवसांनंतर आता संयम तुटतो की काय, अशी भीती खाकीवर्दीला आहे. नागरिक जणू पोलिसांची खिल्ली उडविण्यासाठीच बाहेर पडत आहेत, असेही चित्र आहे. यामुळे अनेक पोलिसांनी समाजमाध्यमांतून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com