परत जाणाऱ्या निधीबाबत जिल्हा परिषद सदस्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव - Zilla Parishad members run to CM regarding returning funds | Politics Marathi News - Sarkarnama

परत जाणाऱ्या निधीबाबत जिल्हा परिषद सदस्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 मार्च 2021

आता 31 मार्च ही मुदत संपल्याने हा निधी मागे जाऊ शकतो. सरकारने या अडचणी लक्षात घेऊन निधी खर्च करण्यास मुदतवाढकरून द्यावी.

नगर : जिल्हा परिषद सदस्यांना आपपाल्या गटात विकास कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून मिळणारा विकास निधी खर्च करण्यासाठी 31 मार्च ही अखेरची मुदत असते; परंतु गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे अनेक कामे झाली नाहीत. त्यामुळे ही मुदत वाढवून 31 मेपर्यंत असावी, अशी मागणी जल्हा परिषदेच्या सदस्यांतून होत आहे. 

याबाबत सदस्य नामदेवराव परजणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे अनेक अडचणी येत आहेत. निर्धारीत वेळेत कामे करता येत नाहीत. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी सदस्यांना आपापल्या गटांमध्ये ग्रामपंचायत कार्यालये, सामाजिक सभागृह, शाळा खोल्या, अंगणवाड्या, नळ पाणी पुरवठा, सार्वजनिक गटारे, शौचकुप, धर्मशाळा आदी विविध कामांसाठी जिल्हा परिषदेमार्फत स्थानिक विकास निधीतून तरतूद असते; परंतु कोरोनामुळे त्यावर विपरित परिणाम झाला आहे.

आता 31 मार्च ही मुदत संपल्याने हा निधी मागे जाऊ शकतो. सरकारने या अडचणी लक्षात घेऊन निधी खर्च करण्यास मुदतवाढकरून द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. 
 

हेही वाचा...

वाडेगव्हाण परिसरात एक कोटी रुपयांची कामे मंजूर

पारनेर : विकास कामे मागण्यासाठी आम्ही कोणत्याही शिवसैनिकास दुसऱ्याच्या दारात जाण्याची वेळ येऊ देणार नाही. तालुक्यातील विविध गावांमध्ये लाखो रूपयांची विकासाची कामे जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून सुरू आहेत. तर वाडेगव्हाण येथे सुमारे एक कोटी रूपयांची कामे मंजूर आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी केले.

वाडेगव्हाण येथे तरवडी, ताऱ्हे व रासकर मळा येथील बंधाऱ्यांचे व इतर विकास कामांचे भूमिपूजन दाते व सभापती गणेश शेळके यांच्या हस्ते झाले. त्या वेळी दाते बोलत होते. या वेळी सरपंच बाळासाहेब सोनवणे, माजी सरपंच सुरेश बोरुडे, प्रमोद घनवट, उपसरपंच रवींद्र शेळके, संतोष शेळके, जयसिंग धोत्रे, युवा सेना प्रमुख नितीन शेळके आदीं मान्यवर उपस्थीत होते.

दाते म्हणाले, की मागील पंचवार्षिक काळातही सुमारे 157 कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावली होती. आम्ही विकासाला महत्त्व देतो व ही शिकवण माजी आमदार विजय औटी यांनी दिल्याचेही ते म्हणाले.

सभापती शेळके म्हणाले, दाते व माझ्या पाठपुराव्यातून वाडेगव्हाण गावात एक कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना मंजूरी मिळविली आहे. ती कामे सध्या सुरू आहेत, त्यातील काही कामांचे आज भूमिपुजन होत आहे. यात प्रामुख्याने तरवडी मळा, ताऱ्हे मळा व रासकर मळा बंधारा या तिनही बंधाऱ्यांना प्रत्येकी 15 लाख रूपये मंजूर झाले आहेत, त्या कामांचा आज प्रारंभ होत आहे. तसेच वाडेगव्हान - राळेगणसिद्धी शिवरस्ता, वाडेगव्हान - नारायनगव्हान शिवरस्ता, तुकाई मंदिर भक्त निवासासाठी , बगिचासाठी व मंदिर परिसर सुशोभीकरण, यासाठी 33 लाख रूपयेमंजूर झाले आहेत, अशी सुमारे एक कोटी रूपयांची कामे केवळ वाडेग्वाण गावात मंजूर केल्याचेही शेळके म्हणाले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख