नगर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कहाॅं गये वोह 20 लाख करोड? हे राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 20 लाख करोडच्या पॅकेजचा हिशोब मागितला जाणार आहे .
पंतप्रधान मोदी यांनी 12 मे 2020 रोजी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. 10 ते 14 ऑगस्ट या कालावधीत चालणाऱ्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते पहिल्या दिवशी शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांच्या या 20 लाख करोड पॅकेजचा काही लाभ मिळाला आहे की नाही, व त्यांच्या प्रतिक्रिया व्हिडीओचित्रित करणार आहेत. सोबतच पंतप्रधान कार्यालयाला फोन करून आणि पत्र लिहून मागण्या समोर ठेवायला मदत करणार आहेत. दर दिवशी एका घटकाला भेटून त्यांच्या मागण्या सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत. छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीमध्ये सवलत मिळाली का, नोकरदारांच्या काय अडचणी आहेत, बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली, याचा पर्दाफाश युवक काँग्रेस करणार आहे. या सर्वांच्या मागण्या व्हिडिओचित्रण करून व पंतप्रधान कार्यालयाला फोन करून व पत्र लिहून सरकारला जाब विचारणार आहे.
मोदी यांनी 20 लाख करोड घोषित केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणाला काय मिळणार, याचे मोठमोठे आकडे तोंडावर फेकले. आता जवळपास 3 महिने उलटले आहेत, पण प्रत्यक्षात मदत कुठे आहे? जर पंतप्रधानांनी जाहिर केलेली मदत खरंच मिळाली असती, तर आज परिस्थिती चांगली असती. 20 लाख करोड रुपयांचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसने हे आंदोलन छेडले आहे, असे सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

