अकोले : पेंडशेत (ता. अकोले) गावात कोरोनाचा शिरकाव झाला व संपूर्ण कुटुंब क्वारंटाईन झाले. वर्षभराचे एकमेव भात पीक लागवडीचा कालावधी होता. मग त्यांची आवणी (भात लागवड) करणार कोण, अशा वेळी गावातील तरुणांनी निर्धार केला व मदतीचा हात देत त्या कुटुंबाची भात लागवड करुन शेती सुजलाम सुफलाम् करून दिली व समाजापुढे आदर्श निर्माण केला.
गावातील तरुण म्हटले की टवाळ व त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा, मात्र याला पेंडशेत गावातील तरुण अपवाद ठरले. कोरोना महामारीच्या काळात क्वारंटाईन असणाऱ्या कुटुंबाच्या मदतीला धावून आले. महाराष्ट्रातील सर्वात उंच असणाऱ्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला. म्हणून प्रशासनाने संपूर्ण कुटुंब क्वारंटाई केले. आदिवासी शेतकरी बांधवाच्या वर्षातील कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव भात पीक व पावसाळ्यात भात लगवडीच्या कालावधीत संपूर्ण कुटुंबच क्वारंटाईन झाले. मग मग त्या कुटुंबाच्या शेतीची लागवड करणार कोण, अशावेळी गावांतील अक्षय पदमेरे, केशव वळे, सुनिल पदमेरे, विठ्ठल पदमेरे, गोपाळ पदमेरे, संतोष पदमेरे, लक्ष्मण पदमेरे, भरत पदमेरे, सखाराम मुंढे, सुनील बांडे, निवृत्ती धादवड, मधुकर धादवड, विठ्ठल मुठे, नामदेव वळे या तरुणांनी एकत्र येऊन संबंधित कुटुंबाला मदत करण्याचा निर्धार केला व विनामोबदला भात लागवड (आवणी) करुन दिली. कुटुंबाच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहाचे एकमेव पीक असणाऱ्या शेतीला जीवनदान देत शेती सुजलाम सुफलाम् करून देत समाजापुढे एक आदर्श निर्माण करुन दिला. कोरोना महामारीच्या काळात या संकटात नडगमगता मदतीला धावून आले. आपल्या आदिवासी संस्कृती दर्शन घडविले.
अडचणीतील कुटुंबाला मदत केल्याचे समाधान
गावात मुंबई येथून आलेल्या चाकरमानी व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबाला आरोग्य विभागाने संस्थात्मक क्वारंटाईन केले. त्यावेळी त्यांच्या शेतात भात अवणीचे काम सुरू होणार होते. अशावेळी हाता तोंडाशी आलेला घास जाणार, त्यामुळे हे कुटुंब दुःखी होते. त्यांची ही अवस्था पाहून आम्ही गावातील तरुण एकत्र येऊन या कुटुंबावर संकट म्हणजे संपूर्ण गावावर संकट समजून आम्ही त्यांची भाताची चिखल तुडवणी व आवणी करून दिली. त्यातून आम्हाला वेगळे समाधान मिळाले, असे मत लक्ष्मण पदमेरे या तरुणाने व्यक्त केले.
Edited By - Murlidhar Karale

