सैराटमधील `परश्या` बनून नगरच्या महिलेला गंडा ! पुण्यातील दिवंगत नगरसेवकपुत्राचा प्रताप

"सैराट' फेम आकाश ठोसर (परशा) याच्या नावाचे बनावट अकाउंट सोशल मीडियावर तयार करून एकाने नगरच्या महिलेशी मैत्री केली. विश्‍वास संपादन करून तो चॅटिंग करू लागला.
chori
chori

नगर : सोशल मीडियावर "सैराट' फेम आकाश ठोसर (परशा) याच्या नावाचे बनावट अकाउंट तयार करून नगरमधील महिलेला दीड लाखाला फसविणाऱ्याला सायबर पोलिसांनी पकडले. अटक केलेला युवक हा पिंपरी चिंचवड महापालिकेतील दिवंगत नगरसेवकाचा मुलगा आहे.  

शिवदर्शन ऊर्फ शिवतेज नेताजी चव्हाण (वय 25, रा. मोहननगर, मंगल आर्केड सोसायटी, प्लॉट नं. 7, पिंपरी, पुणे) असे संशयिताचे नाव आहे. "सैराट' फेम आकाश ठोसर (परशा) याच्या नावाचे बनावट अकाउंट सोशल मीडियावर तयार करून एकाने नगरच्या महिलेशी मैत्री केली. विश्‍वास संपादन करून तो चॅटिंग करू लागला. त्यांचा संपर्क चांगलाच वाढला. दरम्यान, त्याने, "वडील आजारी असून, पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलला ऍडमिट आहेत. मला पैशांची गरज असल्याने पैसे द्यावेत,' अशी मागणी केली. महिलेने, पैसे नाहीत, दागिने असल्याचे सांगितले. नगरमधील मित्राला दागिने घेण्यासाठी पाठवितो, असे म्हणून मित्राच्या नावाखाली तो स्वत: आला आणि एक लाख चाळीस हजारांचे दागिने घेऊन गेला. या वेळी त्याने दोन मोबाईल क्रमांकांचा वापर केला. त्यानंतर महिलेने फोन करून दागिने मागण्यास सुरवात केली. तो टाळाटाळ करत होता. मात्र, त्याने अचानक फोन बंद करून ठेवल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. तिने याबाबत सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

तपासात आरोपी पिंपरी, पुणे येथील असल्याचे कळले. पोलिसांनी 24 मे रोजी त्याला पिंपरीतून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख चाळीस हजारांचे दागिने हस्तगत केले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, 26 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 
पोलिस निरीक्षक अरुण परदेशी, उपनिरीक्षक प्रतीक कोळी, पोलिस हेडकॉन्स्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, राहुल हुसळे यांच्या पथकाने कारवाई केली. 

हेही वाचा...

श्रीरामपूरकरांची डोकेदुखी वाढणार 

श्रीरामपूर : रेड झोनमध्ये असलेल्या मुंबई, औरंगाबाद, मालेगाव येथील नागरिकांचे श्रीरामपूरशी कनेक्‍शन जोडले गेले आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर रेड झोनमधून येत असलेल्या नागरिकांमुळे श्रीरामपूरकरांची डोकेदुखी वाढणार आहे. औरंगाबाद येथून आलेल्या महाराजांचा कोरोना अहवाल काल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी नगरला पाठविण्यात आले. त्यामुळे शहरवासीयांची धाकधूक वाढली. 

तालुक्‍यातील, तसेच शहरातील प्रभाग एक, दोनसह अन्य प्रभागांतील नागरिकांचे नातेवाईक औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, मुंबई येथे राहत असून, ही शहरे रेड झोन घोषित केली आहेत. श्रीरामपूर कोरोनाच्या दृष्टीने सेफ असल्याने, तेथे असलेले या भागातील नागरिक गावी येण्यास प्रथम पसंती दर्शवीत आहेत. एवढेच नव्हे, तर अनेक जण आलेही आहेत. लॉकडाउनमध्ये विविध जिल्ह्यांतून तालुक्‍यात पाच हजार 999 जण आले आहेत. त्यांतील अनेकांचा रेड झोनमधून आलेल्यांमध्ये समावेश आहे. आलेल्यांची प्रशासकीय पातळीवर नोंद असली, तरी छुप्या मार्गाने बाहेरून आलेल्यांची माहिती लपविली जात असल्याने, ही संख्या त्याहून अधिक आहे. 

तालुक्‍याला कोरोनापासून रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने आतापर्यंत मोठे कष्ट घेतले. नागरिकांच्या प्रतिसादामुळे हे शक्‍य झाले. आता लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर शहरातील बाजारपेठही खुली झाली आणि बॅंका, कापड दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. अनेक जण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. भविष्यात हे धोकादायक ठरू शकते. रेड झोनमधून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com