संगमनेर : ``योगी सरकार डरती है.. पुलिसको आगे करती हैं.. योगी मोदी हाय हाय`` या रणभेदी घोषणांनी आज संगमनेर बसस्थानकाचा परिसर दणाणला. आज उत्तर प्रदेशच्या सीमेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी, रणजितसिंह सुरजेवाला आदी नेत्यांना दडपशाहीने अटक केल्याच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरात भाजपा सरकारच्या विरोधात रान पेटले आहे. याचे तीव्र पडसाद संगमनेरातही उमटले.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज युवक काँग्रेसच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. बसस्थानक परिसरातील महात्मा गांधी यांच्या प्रतिमेपासून, घोषणा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप झाला.
या वेळी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले, की उत्तर प्रदेश मधील भाजपशासित योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अत्याचार पीडित दलित युवतीच्या मृतदेहावर रात्री अडीच वाजता तिच्या कुटुंबियांच्या अनुपस्थितीत, पोलिसांच्या मदतीने अंत्यसंस्कार केले. या मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन कऱण्यासाठी निघालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी, रणजीतसिंह सुरजेवाला आदी नेत्यांना योगी सरकारने उत्तर प्रदेशच्या प्रवेशद्वारावरच रोखले. अशी कोणती भीती योगी सरकारला वाटत होती की त्यांनी गांधी परिवारावर दडपशाही करून त्यांना अटक केली.
अत्यंत अमानुष पद्धतीने पोलिसांनी खासदार राजीव गांधी यांना धक्काबुक्की करीत जमिनीवर पाडले. हा भारतीय लोकशाही व संविधानाचा अपमान आहे. लोकशाही प्रणालीत विरोधी पक्षाची मोठी भूमिका असते. मात्र हुकूमशाही पध्दतीने नरेंद्र मोदी व योगी सरकारने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी सरकारची काम करण्याची पध्दत लोकशाहीला काळीमा फासणारी व संविधानाचा अपमान करणारी आहे.
2024 च्या निवडणुकीत जनता मोदी सरकारला त्यांची जागा दाखवणार असल्याचा विश्वास सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला. सुशांतसिंह, रिया चक्रवर्ती, कंगना राणावत यावर बोलणारे भाजप नेते आज गप्प आहेत. महाराष्ट्रात एका छोट्या गोष्टीवरून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या कंगणाचे समाजासाठी योगदान काय, असा सवाल करुन, दंगलराज सुरु असलेल्या उत्तर प्रदेशात महिला भगिनी सुरक्षित नाहीत. त्यामुळे राष्ट्रपती महोदयांनी उत्तर प्रदेशात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली.
या वेळी निखील पापडेजा, सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे, सुभाष सांगळे, नितीन अभंग, निर्मला गुंजाळ, अनिस शेख, शैलेश कलंत्री, गौरव डोंगरे, राजेंद्र वाकचौरे, मुश्ताक शेख, आनंद वर्पे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Edited By - Murlidhar Karale

