काळजी संपली ! अण्णा हजारे यांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह - Worried! Anna Hazare's corona test negative | Politics Marathi News - Sarkarnama

काळजी संपली ! अण्णा हजारे यांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह

एकनाथ भालेकर
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

गावात सहा कोरोना रूग्ण आढळून आल्याने वर्तमळा भाग व हजारे सध्या राहत असलेला परिसर हिंद स्वराज ट्रस्ट परिसर  १४ दिवसांसाठी प्रतिबंधक क्षेत्र तहसिलदार ज्योती देवरे यांनी जाहिर केले आहेत.

राळेगण सिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी केलेल्या रॅपिड अॅंटिजेन व घशाच्या स्रावाची स्वॅब अशा दोन्ही चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली. हजारे यांच्या कोरोनाच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने राळेगण सिद्धी ग्रामस्थांची काळजी दूर झाली.

मंगळवार ( ता. ११ ) ते  काल पर्यंत गावात सहा कोरोना रूग्ण आढळून आल्याने वर्तमळा भाग व हजारे सध्या राहत असलेला परिसर हिंद स्वराज ट्रस्ट परिसर  १४ दिवसांसाठी प्रतिबंधक क्षेत्र तहसिलदार ज्योती देवरे यांनी जाहिर केले आहेत.

राळेगण सिद्धीतील वर्तमळा भागातील एक महिला मंगळवारी कोरोनाबाधित असल्याचे पुणे महानगर पालिकेच्या अहवालावरून स्पष्ट झाले. या महिलेचा पती हजारे यांच्या हिंद स्वराज ट्रस्ट परिसरात कर्मचारी म्हणून कामाला होता. त्याच्याशी थेट संपर्क आला नसला तरीही खबरदारी म्हणून प्रशासन व आरोग्य विभागाने हजारे यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेत बुधवारी दोन चाचण्या केल्या. त्यात रॅपिड अॅंटीजेन चाचणीचा निगेटिव्ह अहवाल त्याच दिवशी आला. तर स्वॅब चाचणीचा अहवाल गुरूवारी रात्री उशिरा आला. हजारे यांच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

वर्तमळा परिसरातील महिलेच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर तिची दोन मुले तसेच अन्य कुटूंबातील तिघे जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.

वर्तमळा व हिंद स्वराज ट्रस्ट परिसर प्रतिबंधक क्षेत्र जाहिर झाल्यानंतर राळेगण सिद्धी गावही लॉकडाऊनचे आदेश तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत. गावांतर्गत रस्ते ये - जा करण्यासाठी बंद केले आहेत. सध्या मूग काढणी सुरू आहे. तसेच दैनंदिन दुध घालण्यासाठी व शेतातून चारा आणणाऱ्या शेतकऱ्यांना ये जा करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख