निळवंडे धरणाचे काम तीन वर्षात पूर्ण होणार - The work of Nilwande dam will be completed in three years | Politics Marathi News - Sarkarnama

निळवंडे धरणाचे काम तीन वर्षात पूर्ण होणार

आनंद गायकवाड
बुधवार, 13 जानेवारी 2021

बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेले काम आम्ही कधी टाळत नाही, त्यांना दिलेला शब्द आम्ही कधी मोडत नाही. भाऊसाहेबानंतर बाळासाहेबांनी या भागाचे नेतृत्व प्रभावीपणाने केले आहे.

संगमनेर : "दिवंगत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सातत्याने पाण्यासाठी आग्रह धरला, तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आग्रही पाठपुराव्यामुळे निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाले, हे कोणी नाकारू शकणार नाही. 2023-2024 पर्यंत निळवंडे धरणाचे सगळे काम पूर्ण होईल. या कामानंतर संगमनेर तालुक्‍यात उसाचे क्षेत्र अजूनही वाढणार आहे.'' असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. 

स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त संगमनेरात आयोजित जयंती महोत्सवात ते अध्यक्षपदाहून बोलत होते. ते म्हणाले, की पाणी फार महत्वाचे असल्याने आपल्या पूर्वजांनी पाण्याचा सातत्याने आग्रह धरला. नगर- नाशिक जिल्ह्याची पाण्याची गरज मोठी आहे. यासाठी वळण बंधाऱ्यातून निर्माण होणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा प्रयत्न आहे. यासाठी केवळ घोषणा न करता या कामासाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला आहे. मुळा नदीवरील तोलारखिंड योजना, सादडा घाट योजना तसेच खिरेश्वर व पाथराघाट योजना तसेच प्रवरा नदीच्या आधी हिवरा नाला व साम्रद नाला आहे, या सगळ्या योजनांना हात घातला आहे. गोदावरी खोऱ्यात अधीकचे पाणी यावे म्हणून नाशिक जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात कामे सुरू केली आहेत. त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात आगामी काळात पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

ते म्हणाले, की बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेले काम आम्ही कधी टाळत नाही, त्यांना दिलेला शब्द आम्ही कधी मोडत नाही. भाऊसाहेबानंतर बाळासाहेबांनी या भागाचे नेतृत्व प्रभावीपणाने केले आहे. सर्वांना बरोबर घेवून जाणाऱ्या या नेत्यामुळे विकास कामाला अधीक गती मिळाली. त्यामुळे राज्यात मोठया प्रमाणात शेततळे असणारा संगमनेर एकमेव तालुका असावा. एकहाती सत्ता बघेल साहेबांनी छत्तीसगडमध्ये आणली. या भाजपवाल्यांना काहीही खरेदी करण्याची अलिकडे सवय लागली आहे. मात्र त्यांचा विजय इतका मोठा होता, की भाजपाच्या मनातही सत्ता घेण्याचा विचार येत नाही. 
कॉंग्रेसच्या काळात उभे केलेले विकून देश चालवण्याचा प्रयत्न देशासाठी घातक आहे. मोदी सरकार शेतकरी व कामगार विरोधी सरकार आहे, असा आरोप त्यांनी केला. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख