नगर : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत राहिलेल्या नगरच्या उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. आज पुलाच्या पाया घेण्याबाबत खोदून मातीपरीक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे अडीच ते तीन वर्षाचा कालावधी अपेक्षित असून, अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांची आर्थिक तरतूद देखील करण्यात आलेली आहे.
संरक्षण विभागातील काही अडचणींमुळे या पुलाचे काम रखडले होते. त्यासाठी खासदार डाॅ. सुजय वखे पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. नगरच्या उड्डाणपुलासाठी देशाचे धोरण बदलण्यासाठी नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे अशक्यप्राय वाटणारी ही परवानगी केंद्राकडून मिळाली. संरक्षण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याने या कामाचे प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकेल. आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांच्या हस्ते पायासाठी आवश्यक असलेले माती परीक्षण म्हणजेच सोईल टेस्टिंग या कामास आज सुरुवात करण्यात आली. या वेळी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवान यांनी तपासणीचा अहवाल एक महिन्यात येईल, असे सांगतले. ओर्किंग परवाना मिळाल्यानंतर नॅशनल हायवेच्या दिल्ली मुख्यालयातून याबाबत पत्र मिळते. याकामी खासदार विखे पाटील यांनी लक्ष घातल्यामुळे हे काम शक्य झाली आहे. त्यामुळेच या कामाला प्रारंभ करता आला आहे, असे दिवान यांनी सांगितले.
अनेकदा झाले उदघाटन
दरम्यान, नगरच्या उड्डाणपुलाच्या कामाबाबत मोठे राजकारण झाले होते. यापूर्वी तीन-चार वेळा मान्यवरांनी उद्घाटन केले. त्यामुळे या पुलाच्या कामासाठी शहरातील अनेक नेते श्रेय़ घेण्यासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. केवळ संरक्षण विभागातील परवानगीमुळे हे काम रखडून पडले होते. आता संबंधित परवानगी मिळाल्याने हे काम सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आज पुलाच्या पायाभरणीसाठी जमिनीतील परीक्षण करण्यासाठी खोदकाम करण्यात आले. लवकरच त्याचा अहवाल येवून प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.
हा उड्डाण पूल नगर-पुणे रस्त्यावर होणार आहे. या ठिकाणी बाजार समिती, बसस्थानक, महाविद्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय, टपाल कार्यालय, बॅंका, आरटीओ अशी महत्त्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे नागरिकांनी या रस्त्यावर कायम वर्दळ असते. पुल झाल्यानंतर पुणे- औरंगाबाद मार्गावरून वाहणारी वाहने पुलावरून जाणार असल्याने हा अडथळा कमी होणार आहे. नगरकर गेले अनेक वर्षांपासून या पुलाच्या प्रतिक्षेत आहेत.

