पाथर्डी : तालुक्यातील तिनखडी गावात नऊ जागेसाठी दहा अर्ज दाखल झाले आहेत. मात्र पतीसाठी पत्नीने अर्ज माघारी घेण्याचे ठरल्याने तेथे नऊच उमेदवार राहतील. सोमठाणे खुर्द येथे सात जागेसाठी सातच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तेथे निवडणूक बिनविरोध झाली आहे. सुसरे गावातही पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत.
पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीच्या 680 जागांसाठी दोन हजार 425 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तिनखडी व सोमठाणे खुर्द या दोन गावच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तेथे जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
तहसिल कार्यालयाला बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. कोरोनाचे नियम पायदळी तुटवीत इच्छुकांनी गर्दी केली होती.
हेही वाचा
राहुरीत सोशल डिस्टन्सिचा फज्जा
राहुरी : तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उच्चांकी गर्दी झाली. तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला.
कोरोनाचे निर्बंध गळून पडले. 418 सदस्यांसाठी एकूण 1407 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची परवानगी दिल्याने, काल दिवसभरात तब्बल 1 हजार 1 उमेदवारी अर्ज दाखल झाले. आज (गुरुवारी) अर्जांची छाननी होणार आहे. वैध अर्ज तहसील कार्यालयामार्फत ऑनलाइन भरले जाणार आहेत. त्यामुळे आज अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची ऑनलाईनच्या कटकटीतून सुटका झाली आहे.
Edited By - Murlidhar Karale

