निळवंडेचे `तारणहार` गप्प का ? विखे पाटील यांचा थोरात यांना टोला - Why is Nilwande's 'Savior' silent? Vikhe Patil's Thorat tola | Politics Marathi News - Sarkarnama

निळवंडेचे `तारणहार` गप्प का ? विखे पाटील यांचा थोरात यांना टोला

शांताराम काळे
शनिवार, 25 जुलै 2020

मागील मान्य केलेले प्रस्ताव व कागद पुढे सरकून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा हक्क आहे, तो मिळालाच पाहिजे. या मताशी आम्ही सहमत आहोत.

अकोले : निळवंडे कालव्याचे कामे बंद करणे, हे चुकीचे आहे. अशी भूमिका सत्ताधारी लोकप्रतिनिधीला घ्यावी लागणे व काम बंद पाडावे लागणे, ही न पटणारी बाब आहे. मात्र निळवंडेचे जे तारणहार आहेत, असे स्वतःला समजतात, त्यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. ते गप्प का आहेत, असा टोला आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला.

राजूर येथे आज माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांना भेटण्यासाठी ते आले होते. या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर उपस्थित होते. माजी मंत्री व आमदार वैभव पिचड यांनी विखे पाटील यांचे स्वागत केले.

या वेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, की जून २०१९ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री यांना भेटून बैठक घेण्यात आली. या वेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड, वैभव पिचड व लाभक्षेत्रातील आमदार तालुक्यातील भाजप कार्यकर्ते, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. त्यावेळी निळवंडे प्रकल्प व कालव्यांबाबत केलेल्या सर्वच मागण्या साधक बाधक विचार करून व माहिती घेऊन मान्य करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सरकार बदलले. आज सत्तेत जी मंडळी आहेत, त्यांच्याकडेच निर्णय प्रक्रिया असताना शेतकऱ्यांना वेठीस धरून हे प्रश्न प्रलंबित ठेवण्याची आवश्यकता नाही. मागील मान्य केलेले प्रस्ताव व कागद पुढे सरकून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा हक्क आहे, तो मिळालाच पाहिजे. या मताशी आम्ही सहमत आहोत. नव्हे तर प्रखर भूमिका घेऊन सरकारला मान्य करण्यास भाग पाडू. मात्र जे सत्तेत व तारणहार समजतात, त्यांनी याबाबत भूमिका घ्यावी. ते गप्प का आहेत, असा टोलाही विखे पाटील यांनी लगावला.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी निळवंडे कालव्याचे काम बंद पाडले. शेतकऱ्यांच्या पाइपलाइन फुटत असल्याचे व त्या तातडीने बदलून दिले जात नसल्याचे सांगून हे काम बंद पाडले असले, तरी सत्ताधारी असताना संबंधित ठेकेदारांना सूचना का दिल्या जात नाहीत, सत्ताधारी असतानाही त्यांना आंदोलन करण्याची वेळ येते, याबाबत विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख