भाजपच्या कार्यकारिणीत शिवाजी कर्डिले यांना डावलणारा `शुक्राचार्य` कोण? - Why did you oust MLA Kardile in the BJP executive? | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या कार्यकारिणीत शिवाजी कर्डिले यांना डावलणारा `शुक्राचार्य` कोण?

मुरलीधर कराळे
शनिवार, 4 जुलै 2020

माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनाही चांगले स्थान मिळाले, मात्र तब्बल अडीच तप वर्षे आमदार असलेले व राजकारणातील मुरब्बी असलेले माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना कार्यकारिणीत स्थान मिळू शकले नाही.

नगर : भारतीय जनता पक्षाची राज्याची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरच्या बहुतेक नेत्यांना कार्यकारिणीत स्थान दिले. माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनाही चांगले स्थान मिळाले, मात्र तब्बल अडीच तप आमदार असलेले व राजकारणातील मुरब्बी असलेले माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना कार्यकारिणीत स्थान मिळू शकले नाही. त्यामुळे भाजपच्या गोटातून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील 12 नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रा. राम शिंदे, प्रीतम मुंडे, चित्रा वाघ अशा दिग्गजांची नावे आहेत. त्याचप्रमाणे मंत्री म्हणून 12 नेत्यांना संधी देण्यात आली असून, त्यामध्ये कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच कार्यकारिणी सदस्यांमध्ये माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, निमंत्रित सदस्यपदी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, चंद्रशेखर कदम तसेच विशेष निमंत्रित समितीत आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री मधुकर पिचड यांचीही नियुक्ती झाली आहे.

एकूणच जिल्ह्यातील बहुतेक भाजप नेत्यांना प्रदेश कार्यकारिणीवर कोणते ना कोणते पद मिळाले आहेत. मात्र माजी मंत्री कर्डिले यांना कार्यकारिणीत कोठेही स्थान दिले नाही. त्यामुळे नगरची कार्यकारिणी कोणाच्या इशाऱ्यावर झाली, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचे उत्तरेकडील प्रेम कशामुळे

कार्यकारीणी जाहीर करताना आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड, भानुदास मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, चंद्रशेखर कदम आदी सहा जणांना स्थान देण्यात आले आहे. हे सर्व नेते उत्तर नगर जिल्ह्यातील आहेत. तथापि, दक्षिणेतील केवळ माजी मंत्री राम शिंदे व माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनाच स्थान मिळाले आहे. आमदार मोनिका राजळे यांनाही संधी मिळाली नाही. त्यामुळे दक्षिणेतील नेते नाराजी व्यक्त करीत आहेत.

नव्याने आलेल्या पिचड पिता-पुत्राला संधी

भाजपमध्ये नव्याने आलेल्या पिचड पितापुत्राला कार्यकारिणीत संधी मिळाली आहे. एकाच घरातील दोघांना संधी मिळाली. मागील विधानसभा निवडणुकीत ते भाजपमध्ये दाखल झाले होते. माजी आमदार वैभव पिचड हे नव्याने भाजपवासी झाले. परंतु त्यांना विजय संपादन करता आला नाही. असे असताना या दोघांना स्थान देण्याऐवजी कर्डिले यांना संधी मिळाली असतील, तर समतोल साधता आला असता, असे कार्यकर्ते बोलू लागले आहेत.

विखे - कर्डिले यांच्यातील वाद मिटल्याचे सूचक पण...

दोन दिवसांपूर्वी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी तनपुरे कारखान्याला जिल्हा बॅंकेची नोटीस मिळाल्याबाबत बोलताना कर्डिले यांची बाजू घेतली होती. कर्डिले यांनी कारखान्याचे हितच जपले आहे, असे त्यांनी म्हटले होते. विरोधकांनी विखे-कर्डिले वादाचा संदर्भ कारखान्याच्या नोटीशीला जोडू नये, असे आवाहनही त्यांनी केले होते. शिवाय लवकरच कर्डिले यांच्यासमवेत आपण नगर तालुक्याचा दाैरा करणार असल्याचे स्पष्ट केले होते. या त्यांच्या वक्तव्यामुळे कर्डिले-विखे यांच्यातील वाद संपुष्टात येत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. तथापि, भाजप कार्यकारिणीत कर्डिले यांना डावलले असल्याने यामागे नेमका कोण आहे, याबाबत आता कार्यकर्ते चर्चा करू लागले आहेत.

कर्डिले यांची राजकीय तपश्चर्या

दरम्यान, कर्डिले यांनी विविध मंत्रीपदे त्यांनी भूषविली आहेत. तसेच जिल्ह्याचे राजकारण फिरविण्याची त्यांच्यात ताकद आहे. असे असताना त्यांचा समावेश कार्यकारिणीत नसणे म्हणजे पंख छाटण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया भाजपचेच कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. त्यांच्या राजकीय तपश्चर्येचा तरी पक्षाने विचार करायला हवा होता, असेही कार्यकर्ते बोलू लागले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख