नगर : भिवंडीत कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून आरोपप्रत्यारोपांना उधाण आले आहे. खरे तर आघाडी सरकार (विरोधकांच्या म्हणण्यानुसार रिक्शा सरकार) चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. कारण किमान समान कार्यक्रमावर तीन पक्ष एकत्र आलेले आहेत. असे असताना नगरला शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेल्या 5 नगरसेवकांमुळे पडलेली ठिणगी विझविण्यात नेत्यांना यश आले, परंतु भिवंडीत भडकलेली आग विझविण्यात नेत्यांना अपयश का आले, हाच आगामी काळात कळीचा मुद्दा ठरणार आहे.
कोणी कोणाची माणसं फोडायची नाहीत. मात्र ही फोडाफोडी नाही केली, तरी प्रत्येक पक्षात नाराजी असते. त्यामुळे पक्षांतर होते. राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून तसा कारभार सुरळीत चालला आहे. पण, छोट्यामोठ्या कुरबुरी सुरू आहेत. त्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना सर्वांचे समाधान करावे लागते. एक पाऊल मागे घ्यावे लागते.
पारनेर नगर पंचायत समितीच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून आमदार निलेश लंके यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आघाडीमधे पहिली ठिणगी नगरमध्ये पडली होती. त्यानंतर आता भिवडीत पडली. भिवंडीत कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेते नाराज आहेत. राष्ट्रवादी आमच्या नगरसेवकांना घेतेच कसे? असा सवालही नेते करीत आहेत. अकोले तालुक्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित राष्ट्रवादीचा एक आणि भाजपच्या एक नेत्यांने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. म्हणजेच आघाडी धर्माचा विचार केला, तर कोणीच कोणाविरोधात शिंतोडे उठविण्याचे मुळात कारण नाही.
पारनेरमध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी चांगलाच थयथयाट केला. आमचे नगरसेवक आम्हाला परत द्या, अशी थेट मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांनीही केली होती. पुढे बैठक होऊन पाच नगरसेवकांची घरवापसी केली. त्यावेळी गोडीने सर्वांनी घेतले. मात्र जे नगरसेवक पुन्हा शिवसेनेत गेले आहेत, ते खरंच समाधानी आहेत का ? हा ही प्रश्न आहे.
सत्तेत तीन पक्ष असणे वेगळे आणि पक्ष चालविणे वेगळे. पक्षाचा विस्तार कसा होईल. आपले आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य कसे निवडून येतील, यासाठी प्रयत्न सुरू होतात. पक्ष म्हटले की नाराजी ही असते. या नाराजीला स्थानिक मुद्दे असतात. त्यामुळे आयाराम गयारामाची ही प्रक्रिया राजकारणात कधीच थांबणार नाही.
अकोले तालुक्यात राष्ट्रवादीचा नेता फोडल्यानंतर या पक्षाच्या नेत्यांनी आकांडतांडव केला नाही. पारनेरबाबत शिवसेनेने जो थयथयाट केला, परंतु उद्या राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसचा नेता जर शिवसेनेत गेला, तर ते त्यांना प्रवेश देणार नाहीत का ? स्थानिक पातळीचे राजकारण विविध रंगाने भरलेले असते. त्याला संदर्भही वेगळे असतात. हे मुळात लक्षात घेणे गरजेचे आहे.
पारनेरमध्ये शिवसेनेने मागितले म्हणून पाच नगरसेवक परत दिले. तसेच प्रत्येक वेळी होईलच, असे म्हणता येणार नाही. भिंवडीत अठरा नगरसेवक फुटतात. ते का नाराज आहेत, याचा विचार कॉंग्रेसच्या नेतृत्वाने करायला हवा. तसाच तो शिवसेना आणि राष्ट्रवादीने करायला हवा. राज्यात फडणवीस सरकारच्या काळात राष्ट्रवादीला मोठी गळती लागली होती. म्हणून या पक्षाचे नेते हतबल झाले नाहीत. उलट राष्ट्रवादीने दुसरी फळी तयार केली. त्यांना लढण्याचे बळ दिले. त्यामुळे विधानसभेत काय झाले, हे सर्वश्रूत आहे.
सत्ता असली की पक्षात आयाराम मोठ्या संख्येने येत असतात. आता तर तीनही पक्ष सत्तेत आहेत, त्यामुळे इन कमिंग होणारच. शेवटी इतकेच म्हणावे लागेल, की भविष्यातही अशा कुरबुरी होत राहाणार आहेत. राष्ट्रवादी 16 नगरसेवक कॉंग्रेसला परत देतील का? किंवा कॉंग्रेस राष्ट्रवादीला तो नेता देईल? हे प्रश्न आहेत. मुद्दाम फोडाफोडी केली तर समजू शकतो. पण स्वत:हून जर कोणी एखाद्या पक्षात जात असेल, तर त्यांना ूरोखता येणार नाही.
Edited By - Murlidhar karale

