नगर : बाजार समितीत गेल्या आठ वर्षांत संचालकांनी सुमारे 80 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता, त्यावर सत्ताधाऱ्यांनी हा कारभार स्वच्छ असल्याचा गवगवा केला. हा कारभार स्वच्छ आहे, तर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी अंधारात उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचे पाय का धरले, असा प्रश्न अहमदनगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केला.
नगरमधील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमच्या सत्ताधाऱ्यांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांशी बोलताना संचालकांवर आरोपाच्या फैरी झाडल्या. आघाडीचे नेते संदेश कार्ले म्हणाले की, बाजार समितीमध्ये अनधिकृत बांधकामे, गाळेवाटप, मोकळ्या जागा वाटप, बेकायदेशीररीत्या केलेला दैनंदिन खर्च या माध्यमातून गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये विद्यमान संचालक मंडळाने सुमारे ८० कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार केला आहे. याबाबत अनेकदा विचारणा करण्यात आली, तथापि, त्याला उत्तर देण्यात आले नव्हते. आता मात्र बाजार समितीच्या काही संचालकांकडून हा कारभार स्वच्छ असल्याचा दावा केला. कारभार स्वच्छ होता, तर त्यांना सत्ताधाऱ्यांचे पाय धरण्याची काय गरज होती. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंधारात पाय कशासाठी धरले, असा प्रश्न कार्ले यांनी उपस्थित केला.
चोरांच्या हातात बाजार समिती
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उद्धवराव दुसुुंगे म्हणाले की, बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गैरकारभार सुरू असून, मतदारांनी चोरांच्या हातात बाजार समिती दिली. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम माजी आमदार कर्डिले यांनी केले. बाजारसमितीच्या कारभाराची चाैकशी झाली पाहिजे, अशी अपेक्षा दुसुंगे यांनी व्यक्त केली.
त्या चाैकशीचे काय झाले
दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या गैरकारभाराची चाैकशी करण्यासाठी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यासाठी चाैकशी अधिकारीही नेमला. नंतर मात्र ही चाैकशीच बासणात गुंडाळण्याचे काम झाले. या चाैकशीची पुढे काय झाले. चाैकशीला स्थगिती का दिली, याचीही चाैकशी व्हावी, अशी मागणी संदेश कार्ले यांनी केली आहे.

