माझ्यासारखा विचित्र माणूस कुणी नाही, असं आमदार रोहित पवार का म्हणाले? - Why did MLA Rohit Pawar say that there is no strange person like me? | Politics Marathi News - Sarkarnama

माझ्यासारखा विचित्र माणूस कुणी नाही, असं आमदार रोहित पवार का म्हणाले?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

लोकांना विश्वासाने दिलेला शब्द माझ्यासाठी महत्वाचा असतो. लोकांच्या मागणीनुसार मी पाठपुरावा केला. वरिष्ठ नेत्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आणि हे काम मार्गी लागले.

सिद्धटेक : 'रोहित्र जोडणीसाठी शेतकऱ्यांकडुन महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याच्या काही तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. हे मला बिलकुल चालणार नाही आणि मी खपवूनही घेणार नाही. शेतकऱ्यांचे फोन वेळेत घ्या, त्यांना सहकार्य करा, तेही तुम्हाला सहकार्य करतील. नाहीतर माझ्यासारखा विचित्र माणूस कुणी नाही, असे म्हणत आमदार पवार उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांवर भडकले. 

गणेशवाडी येथे 'दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत' कार्यान्वित झालेल्या 33/11 के.व्ही. विज उपकेंद्रांच्या उद्घाटन व लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास कायगुडे होते. उपसभापती हेमंत मोरे, कल्याण दातीर, बाबुलाल शेख, लालासाहेब कायगुडे, ज्ञानदेव खताळ, शिवाजी ठोंबरे, विजय देवकाते, भिवराज कायगुडे, गणपत कायगुडे, गणेश मराळे, लाला माने, भरत पावणे तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता सुरेश कुऱ्हाडे, उपकार्यकारी अभियंता अशोक घुले, चाचणी विभागाचे रोहन धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, की लोकांना विश्वासाने दिलेला शब्द माझ्यासाठी महत्वाचा असतो. लोकांच्या मागणीनुसार मी पाठपुरावा केला. वरिष्ठ नेत्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आणि हे काम मार्गी लागले. शेजारील गावांना या उपकेंद्राचा फायदा होईल. खेड, भांबोरा या उपकेंद्रांवर पडणारा अतिरिक्त भारही कमी होईल. आता इथले राजकारण बदलेल आणि विकासाच्या राजकारणाकडे सर्वांचा कल राहील. लोकांच्या हितासाठी जातीय राजकारण नाही, तर फक्त विकासाचं राजकारण करायचंय, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी पाणंद रस्ते मोहीम हाती घेण्यात आली असून, कर्जतचे 95 तर जामखेडचे 100 पाणंदरस्ते होत आहेत. बुडीत बंधाऱ्याचा जिव्हाळ्याचा विषयही मार्गी लागणार असून, भीमापात्रात सुमारे 42 किलोमीटरपर्यंत बॅकवॉटरचा फुगवठा कायम राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये.

उपकार्यकारी अभियंता अशोक घुले यांनी प्रास्ताविक सादर केले. रविंद्र पाडुळे,विजय कायगुडे, महादेव कायगुडे यांनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, महाराष्ट्रभर शेतकऱ्यांसाठी आपण कायम तत्पर असू, असे पवार यांनी म्हटले.

 

हेही वाचा...

होळीसह रंगपंचमीला गर्दी टाळा

श्रीरामपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. आगामी काळात सामाजिक, सांस्कृतिक राजकीय व धार्मिक कार्यक्रमासाठी नागरीकांनी एकत्र येण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम असल्याने होळी, धूलिवंदन व रंगपंचमीचा सण गर्दी टाळुन साधेपणात साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोरोनाचा संर्सग रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी सोमवार (ता. 28) ते शुक्रवार (ता. 2) सण-उत्सव काळात कोणत्याही सार्वजनिक स्वरुपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनास बंदी घातली आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख