नगर : आजी-माजी आमदार-खासदारांना पक्षाची काहीतरी जबाबदारी देऊन राजकारणात सक्रीय ठेवले जाते. भाजपने आगामी होणाऱ्या नगर पंचायत व नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी काही नेत्यांवर जबाबदारी टाकली आहे. मात्र माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर कोणतीही जबाबदारी टाकली नाही, त्यांना का डावलले, असा प्रश्न कार्यकर्त्यांतून उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील आगामी होणाऱ्या निवडणुकीत भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पारनेर, कर्जत येथील नगरपंयतीची निवडणूक होणार असून, जामखेड व शेवगाव येथे नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीतील तिनही पक्ष काही ठिकाणी समन्वयाने एकत्र लढतील, तर काही ठिकाणी मात्र तशी शक्यता नाही. एकूणच या लढतीमध्ये महाविकास आघाडीतील काॅंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे पक्ष तर विरोधात भाजप असे चित्र निर्माण होऊ पाहत आहे. काही ठिकाणी मात्र राष्ट्रवादी-शिवसेनेमध्येच लढत होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने मात्र सर्व ठिकाणी उमेदवारी देऊन जोरदार लढत देण्याचे नियोजन केले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
पारनेरसाठी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची प्रभारी म्हणून निवड केली आहे. तेथे शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांत लढत होण्याची चिन्हे आहेत. त्यामध्ये कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कशा पद्धतीने मुसंडी मारेल, हे दिसून येणार आहे.
कर्जत नगर पंचायतीसाठी प्रभारी म्हणून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची नियुक्ती केली आहे. कर्जत येथे माजी मंत्री प्रा. राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांत लढत होणार आहे. मुरकुटे यांच्याकडून प्रा. शिंदे यांना कशा पद्धतीने मदत होते, हे दिसून येणार आहे.
जामखेडसाठी माजी नगराध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जामखेड येथेही प्रा. शिंदे व आमदार पवार यांच्याच कार्यकर्त्यांत लढत होणार असल्याने अॅड. आगरकर यांची मदत शिंदे यांना होणार आहे.
शेवगाव नगरपरिषदेसाठी आमदार बबनराव पाचपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथेही भाजपची सत्ता आणण्यासाठी पाचपुते यांना विशेष प्रय़त्न करावे लागणार आहेत.
नगर दक्षिणेत तीन वेळा खासदार राहिलेल्या व दिल्लीश्वरापर्यंत विशेष वजन असलेल्या भाजपनेते दिलीप गांधी यांना मात्र या निवडीतून हुलकावणी दिली आहे. पक्षाने गांधी यांना का डावलले, असा प्रश्न कार्यकर्त्यांतून उपस्थित होत आहे.

