खंडणीचा मास्टरमाईंड कोण? आमदार पाचपुते यांचा सवाल - Who is the mastermind of ransom? Question from MLA Pachpute | Politics Marathi News - Sarkarnama

खंडणीचा मास्टरमाईंड कोण? आमदार पाचपुते यांचा सवाल

संजय आ. काटे
मंगळवार, 23 मार्च 2021

गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी ओळखतो, ते असे वागतील असे वाटत नव्हते. मंत्रीच पैसे मागू लागले, तर इतरांना काय नावे ठेवणार.

श्रीगोंदे : गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी ओळखतो, ते असे वागतील असे वाटत नव्हते. मंत्रीच पैसे मागू लागले, तर इतरांना काय नावे ठेवणार, असा सवाल करीत भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी शंभर कोटी रुपयांच्या कथीत खंडणीचा मास्टरमाईंड कोण, याची चौकशी करण्याची मागणी केली. 

हेही वाचा... भाजपच्या हाती आयते कोलीत

खंडणीचा आरोप झालेल्या गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा द्यावा, तसेच केंद्राने हस्तक्षेप करीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागण्यांसाठी भाजपतर्फे काल तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी बोलताना पाचपुते म्हणाले, ""सरकार चालवून लोकांची सेवा करण्यापेक्षा गल्लाभरू राजकारण मंत्र्यांनी सुरू केले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असणारी मोटर उभी केली जाते. ज्याने उभी केली, त्यालाच तपास दिला जातो. अंबानी यांच्याकडून कोट्यवधीची खंडणी वसूल करण्यासाठी ही मोटर लावली गेली होती.'' 
गृहमंत्री देशमुख यांना आपण अनेक वर्षांपासून ओळखतो, ते असे करतील अशी अपेक्षा नव्हती. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अंबानी यांच्या घरापुढील मोटारीमागे नेमके कोण आहे, असा प्रश्न उपस्थित केला. तसाच या शंभर कोटींच्या मागणीमागील मास्टरमाईंड शोधण्याची गरज आहे. त्यासाठी देशमुख यांनी राजीनामा द्यावा व केंद्राने राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी पाचपुते यांनी केली. 

हेही वाचा... गायकर यांनी पिचडांचे काम केलेच नाही

आपल्यावर एकही आरोप नाही

पाचपुते म्हणाले, की आपण 40 वर्षे राजकारणात आहोत. या काळात अनेक मंत्रिपदे सांभाळली. त्यात गृह राज्यमंत्रीही राहिलो; पण आपल्यावर एकही आरोप झाला नाही. मात्र, या सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांचे सत्र सुरू आहे. देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी झाली पाहिजे. शिवाय कोरोना काळात मोठा भ्रष्टाचार झाला असून, त्याचीही चौकशी करावी. 

 

Edited By - Murlidhar karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख