नगर जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

बॅंकेच्या 21 पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या. 4 जागांसाठी मतदान झाले. त्यात महाविकास आघाडीला 15, तर भाजपला 6 असे संख्याबळ झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेच अध्यक्षपदाचा निर्णय घेणार आहेत.
Ghule and jagtap.jpg
Ghule and jagtap.jpg

नगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाची लवकरच निवड होणार आहे. महाविकास आघाडीच्या जागा जास्त असल्याने अध्यक्षही त्यापैकीच होईल. माजी आमदार चंद्रशेखर घुले व माजी आमदार राहुल जगताप यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. हायकमांडकडे कोणाचे पारडे जड होते, हे लवकरच दिसून येणार आहे. 

बॅंकेच्या 21 पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या. 4 जागांसाठी मतदान झाले. त्यात महाविकास आघाडीला 15, तर भाजपला 6 असे संख्याबळ झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेच अध्यक्षपदाचा निर्णय घेणार आहेत. या पदासाठी घुले व जगताप हे दावेदार असल्याचे सांगितले जाते. नूतन संचालक मंडळात जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे हे दिग्गज आहेत. 

आमदार आशुतोष काळे, माजी आमदार राहुल जगताप, विवेक कोल्हे, प्रशांत गायकवाड, अमित भांगरे, करण ससाणे, अमोल राळेभात या तरुण चेहऱ्यांना बॅंकेत नव्याने संधी मिळाली आहे. अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसकडे मोठा चेहरा नाही. तसेच राजकीय घडामोडीत राष्ट्रवादीचेच पारडे जड असल्याचे दिसून येते. त्यामुळे अध्यक्षही राष्ट्रवादीचाच होईल, अशी शक्‍यता आहे. शिवसेनेचे मंत्री गडाख हे संचालक असले, तरी त्यांच्याकडे मंत्रिपद असल्याने अध्यक्षपदासाठी त्यांचा पत्ता कट झाल्याचे मानले जाते. 

तरुण चेहऱ्याला संधी शक्‍य 

माजी आमदार राहुल जगताप यांनी विधानसभेला उमेदवारी केली नाही. राष्ट्रवादीतील तरुण चेहरा म्हणून राज्याच्या राजकारणात त्यांची विशेष ओळख आहे. त्यांच्या मागे आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप खंबीरपणे उभे आहेत. सहकारातील दिवंगत नेते कुंडलिकराव जगताप यांचे ते पूत्र आहेत. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत ते पहिल्याच प्रयत्नात बिनविरोध निवडून आले. विशेषत: श्रीगोंदे तालुक्‍यात भाजपचे आमदार बबनराव पाचपुते असतानाही जगताप भारी भरले. श्रीगोंद्यात चार साखर कारखाने आहेत. या तालुक्‍यात राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी जगताप यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकते. जिल्हा बॅंकेत अनेक वर्षे असतानाही शिवाजीराव नागवडे त्यांना अध्यक्षपदाने हुलकावणी दिली. जगताप यांच्या रुपाने श्रीगोंद्याला अध्यक्षपद मिळू शकेल, असे राजकीय तज्ज्ञांना वाटते. 

पडद्यामागील सूत्रे हलविली 

माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनाही विधानसभेला उमेदवारी मिळाली नव्हती. त्यावेळी समझोता होऊन राष्ट्रवादीने ऍड. प्रताप ढाकणे यांना उमेदवारी दिली. ज्ञानेश्वर कारखान्याचे अध्यक्षपदही माजी आमदार नरेंद्र घुले यांना दिले. चंद्रशेखर घुले यांच्या पत्नी राजश्री घुले सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. जिल्ह्याचे एक मोठे पद त्यांच्या घरात आहे. नरेंद्र घुले हे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे मेहुणे आहेत. बॅंक निवडणुकीत बहुतेक जागा बिनविरोध करण्यासाठी पडद्यामागून घुले यांच्यासह माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सूत्रे हलविल्याचे मानले जाते. त्यामुळे जिल्हा बॅंक अध्यक्षपदी चंद्रशेखर घुले यांना संधी मिळू शकते.

Edited By- Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com