या आमदारांनी केली तुलना ! नैसर्गिक संकटसमयी कोण भारी, भाजप की महाआघाडी सरकार

कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या निसर्ग वादळाच्या संकटातून ‘महाराष्ट्र’ सुखरूप बाहेर पडला.हे संपूर्ण यश राज्यशासन, प्रशासन आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याचं आहे.
rohit-pawar-27fina.jpg
rohit-pawar-27fina.jpg

नगर : पूर्वतयारी असेल, तर कोणत्याही संकटावर मात करता येते, हे महाआघाडी सरकारने कोरोना व चक्रीवादळाच्या निमित्ताने दाखवून दिले. यापूर्वी सांगली, कोल्पापूरला पाण्याने वेढा दिला, त्या वेळी भाजप सरकारी पूर्व तयारी काय होती. केवळ तत्कालिन सरकारचा नियोजनशुन्य कारभारच त्याला जबाबदार होता, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे केला आहे.

मागील वर्षी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा सामना करावा लागला होता. त्यावेळी तत्कालीन राज्यशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या व आज 'निसर्ग' वादळात कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याची तुलनात्मक माहिती पवार यांनी मांडली. यात कुठेही राजकारण नाही, पण वास्तुस्थितीही लोकांपुढे यायला हवी, म्हणून हे सांगतोय, असे त्यांनी म्हटले आहे.

कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या निसर्ग वादळाच्या संकटातून ‘महाराष्ट्र’ सुखरूप बाहेर पडला. हे संपूर्ण यश राज्यशासन, प्रशासन आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याचं आहे. हे वादळ कुठून कुठे चालले, याचे थेट प्रक्षेपणच आॅनलाईनच्या माध्यमातून लोकांना कळत होते. आपल्या गावावर येणारे हे वादळ कोणत्या दिवशी व किती वाजता येऊ शकेल, याचा अंदाज लोकांना येत होता. सोशल मीडियावर काम करणाऱ्या युवकांनी याबाबतची माहिती सर्वदूर पोहचविली. त्यामुळेच लोक सावध झाले व नुकसान, मनुष्यहाणी टळली. याबद्दल युवकांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत, असे पवार यांनी म्हटले आहे.

महापुराच्या वेळी काय झालं होतं?कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागल्यानंतर संभाव्य पूर परिस्थितीबाबत तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी राज्यशासनासोबत समन्वय साधत अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याची मागणी केली. मात्र पुराने महापुराचे रौद्ररुप धारण केल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी राज्यशासनाला जाग आली. या संपूर्ण घडामोडीत कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्य सरकारांमध्ये आजिबात समन्वय दिसला नाही. विशेष म्हणजे तेंव्हा दोन्ही राज्यांमध्ये एकाच पक्षाची सत्ता होती. 

याउलट आज 'निसर्ग' वादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दोन दिवसांपूर्वीपासूनच केंद्र सरकारसोबत समन्वय साधून होते. कोणतेही राजकारण मध्ये येऊ न देता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत संपर्क साधून त्यांनी केंद्र-राज्य समन्वय ठेवला होता. 

सांगली-कोल्हापुरच्या महापूरात NDRF ला लवकर पाचारण करण्यात आले नव्हते. त्यातही NDRF च्या तुकड्याची संख्या कमी असल्याने ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून मोठी जिवीतहानी झाली. याउलट हवामान विभागाने वादळाचा अंदाज वर्तवताच कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांमध्ये NDRF च्या तुकड्या एक दिवसांपूर्वी हजर केल्या गेल्या. 

कोणत्याही संकटात संभाव्य संकटाची पूर्वसूचना व योग्य माहिती लोकांपर्यंत पोहचण्याची गरज असते. वादळापूर्वीच वादळाचा संभाव्य मार्ग आखण्यात आला होता. त्याची वेळ निश्चित करून लोकांपर्यन्त ही माहिती पोहचवण्यात आली होती. मार्गात असणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. याशिवाय समुद्रात असणाऱ्या मच्छिमारांना कालपासूनच सुरक्षित माघारी बोलावण्यात आले. याकामी तटरक्षक दलाने व स्थानिक प्रशासनाने उत्तम काम केले. हेच आपण सांगली कोल्हापुर महापूराबाबत पहायला गेलो, तर लोकांना कोणतीही पुर्वसूचना मिळाली नव्हती. अफवा पसरल्या होत्या व शासनाद्वारे पाण्याच्या पातळीचा अंदाज लावण्यास उशीर होत होता. यामुळे कित्येक गावांना पुराचा घट्ट वेढा बसत गेला आणि लोक पुरात अडकले गेले.

तेव्हा भाजप महाजनादेश यात्रेत गुंग होता

शासनाने केलेल्या मदतीचा महापूरात सांगली-कोल्हापूर गटांगळ्या खात असताना तेंव्हाचा सत्ताधारी भाजप ‘महाजनादेश’ यात्रेत गुंग होता. महापुराचा विळखा घट्ट होत असतानाही ही यात्रा थांबवण्यात आली नाही. याउलट आजच्या शासनाने कोरोनासोबत लढतानाही 'निसर्गा'शी दोन हात करण्यासाठी जोमाने तयारी केली व ती यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळेच जिवीतहानी टाळता आली. अर्थात या वादळाचा रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसला. इतर जिल्ह्यातही काही प्रमाणात नुकसान झालं, पण पूर्वतयारी केल्याने त्याची तीव्रता रोखण्यात स्थानिक प्रशासन मात्र यशस्वी ठरलं, असंच म्हणावं लागेल. तसंच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील पालकमंत्री, आमदार हे सर्वजण अत्यंत चांगलं काम करत आहेत, असे काैतुक आमदार पवार यांनी केले आहे.

घर वाहुन गेलेले लोक बॅंकेचे कागदपत्रे देणार कोठून

आज महा आघाडीसरकारने झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले. तत्कालीन सरकारने मात्र पूरग्रस्तांसाठी मदतीची मोठी घोषणा करुन अवघे १५४ कोटी रुपये मंजूर केले आणि त्यातही हे पैसे बँकेमार्फतच मिळतील, अशा अव्यवहारीक अटी घातल्या. वास्तविक पुरामध्ये घर वाहून गेलेल्या लोकांनी बँकेची कागदपत्रे आणावीत, अशी अट घालणं, हेच मुळात हास्यास्पद आहे. याशिवाय दोन दिवस पाण्यात असाल, तरच धान्य मिळेल अशीही अट टाकण्यात आली, हे सर्वच हश्यास्पद आहे, असे पुष्टी त्यांनी जोडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com