भाजपमध्ये असो किंवा राष्ट्रवादीत, लहामटे - भांगरेंचा विरोधाचा पिळ कायम - Whether in the BJP or in the NCP, Lahamte-Bhangare's opposition did not go away | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपमध्ये असो किंवा राष्ट्रवादीत, लहामटे - भांगरेंचा विरोधाचा पिळ कायम

सरकारनामा ब्युरो
रविवार, 5 जुलै 2020

दोघांचे मनोमिलन झाले असते, तर दोघेही एकाच पोस्टर्सवर झळकले असते. हे दोघेही नेते भाजपमध्ये होते, त्यावेळीही एकत्र दिसले नाही, आणि आता पक्ष बदलला तरीही त्यांच्यात सूत जुळता दिसत नाही.

नगर : विनाधनसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी पारंपरिक विरोधक  किरण लहामटे व अशोक भांगरे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र तेथेही दोघांचे सुत जुळता दिसेना. त्याचे प्रत्यंतर कृषीदिनानिमित्त दिसून येत आहे. दोघांच्याही कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांचे पोस्टर्स स्वतंत्रपणे लावले आहेत. दोघांच्याही पोस्टर्सवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे छायाचित्रे आहेत, ही जमेची बाजू. 

विधानसभेच्या निवडणुकीत भाजपमध्ये असताना एकमेकांची स्पर्धा करणारे भांगरे - लहामटे आमदारकीची अगोदरच लाईन टाकून बसले होते. अचानक दोघांनाही अंधारात ठेवून भाजपश्रेष्ठींनी पिचड पिता- पुत्रांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले. पिचड यांचा वाजत गाजत प्रवेश भाजपमध्ये झाल्याने भांगरे-लहामटे यांचे मनसुबे उधळून गेले. 

पिचड यांच्याशी कधीच नाळ न जुळल्याने भांगरे यांनी घाईगडबडीत राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्याशी संपर्क केला व विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली. डाॅ. लहामटे यांनी अगोदर शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करून भाजप सोडण्याचा निर्णय घेतला व शिवसेनेचा भगवा गळ्यात बांधला. मात्र भाजप शिवसेनेची युती होताच आपल्याला उमेदवारी मिळणार नाही, हे ओळखून लहामटे यांनी थेट राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. पवार यांनी लहामटे व भांगरे यांनाच प्रतिप्रश्न करून तुम्ही दोघे एकत्र या, व तुम्हीच ठरवा उमेदवारी कोणाला हवी. फक्त पिचड यांचा पराभव करायचा, हे निश्चित, असे ठणकावून सांगितले.

या दरम्यान दोघांनीही बारामती येथे पवार यांची भेट घेतली. अशोक भांगरे व लहामटे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. कोणाला तिकिट मिळणार, याबाबत मात्र उत्सुकता ताणली होती. याच दरम्यान अजित पवार यांनी अकोले येथे येऊन मोठी सभा घेतली. तिकिटासाठी भांगरे व लहामटे यांच्याकडून शक्तीप्रदर्शन झाले. त्यापूर्वी राष्ट्र सेवादलाच कार्यकर्त्यांनी सर्व पिचड विरोधक असणाऱ्यांना एकत्र करून बेलभांडर देऊन आम्ही एकत्र राहू, कुणालाही तिकीट मिळाले, तर त्याचा प्रचार करू, असे सांगितले

सभेच्या दिवशी लहाटमे यांच्या कार्यकर्त्यांनी लहामटे यांच्याविषयीच्या घोषणा दिल्या, तर भांगरे यांच्या कार्यकर्त्यांनी भांगरे यांच्या नावाच्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला. त्यामुळे दोघांमध्ये एकवाक्यता नाही, असे चित्र निर्माण झाले. दोघांमध्ये मनोमिलन नसेल, तर पिचड यांचा पराभव करणे अशक्य होईल, हे ओळखून पवार यांनी दोघांनाही बोलावून घेतले. तुमच्यात एकमत नसेल, तर पिचड पराभूत कसे होतील, असे समजावून सांगितले. नंतर डाॅ. लहामटे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली.

... तरीही एकत्र दिसेना

निवडणूक झाली, डाॅ. लहामटे आमदार झाले. तरीही भांगरे व लहामटे यांचे कार्यकर्ते एकत्र येताना दिसत नाहीत. पक्षाच्या कार्यक्रमाला एकत्र येणे स्वाभाविकच आहे, ताथापि, इतर कार्यक्रमांसाठी एकत्र दिसत नाही. उलट कृषी सप्ताहाच्या कार्यक्रमांनिमित्ताने दोघांचेही एकत्र पोस्टर्स पाहण्यास मिळत आहेत. दोघांचे मनोमिलन झाले असते, तर दोघेही एकाच पोस्टर्सवर झळकले असते. हे दोघेही नेते भाजपमध्ये होते, त्यावेळीही एकत्र दिसले नाही, आणि आता पक्ष बदलला तरीही त्यांच्यात सूत जुळता दिसत नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख