मुळा धरणाच्या वेगाने झेपावणाऱ्या पाण्यात तरुण अडकतो तेव्हा !

पर्यटकांसह उपस्थित काही पत्रकारांनी एक तरुण पाण्याने वेढलेल्या भिंतीवर बसल्याचे पाहिले. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला.
mula.png
mula.png

राहुरी : मुळा धरणाचे अकरा दरवाजे उघडले. प्रचंड वेगाने जलप्रपात धरणाच्या दरवाजा खालील स्थिर पात्रात कोसळून, नदीपात्राच्या दिशेने वेगाने वाहू लागला. स्थिर पात्राच्या मधोमध असलेल्या भिंतीवर एक तरुण अडकला. पाण्याने वेढलेल्या तरुणाला पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच उघडलेले सर्व दरवाजे पुन्हा बंद केले. दरवाजांच्याखाली स्थिर पात्राच्या भिंतीवर अडकलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. पंधरा मिनिटांनी पुन्हा दरवाजे उघडण्यात आले.

धनराज बर्डे (वय २०, रा. नांदगाव) असे अडकलेल्या तरुणाचे नाव आहे. जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. काल धरणाचे दरवाजे उघडण्यात सुरुवात झाली. ते दृश्य पाहण्यासाठी आलेला धनराज बर्डे थेट दरवाजांच्या खाली असलेल्या स्थिर पात्राच्या भिंतीवर चढला. पहिले तीन दरवाजे उघडले. धनराज भांबावला. तसाच बसून राहिला. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत सर्व अकरा दरवाजे उघडले. झपाट्याने स्थिर पात्रात पडलेले पाणी मुळा नदी पात्राच्या दिशेने वेगाने वाहू लागले. धनराजच्या चारही बाजूने पाण्याने वेढा दिला. धनराज अडकला.

पर्यटकांसह उपस्थित काही पत्रकारांनी एक तरुण पाण्याने वेढलेल्या भिंतीवर बसल्याचे पाहिले. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. पत्रकारांनी जलसंपदा खात्याचे धरण शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून, घटनेची माहिती दिली. कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी तातडीने दरवाजे बंद करण्याचे आदेश दिले. पाणी कमी झाले. धनराजला सुखरूप बाहेर काढण्यात आले. पंधरा-वीस मिनिटे धनराज पाण्याने वेढला होता. त्याच्या जवळून दोन हजार क्युसेक प्रतिसेकंद वेगाने प्रचंड आवाज करीत जलप्रपात नदीपात्रात वेगाने जात होता. नशीब बलवत्तर म्हणून धनराजचे प्राण वाचले.

घटना घडल्यानंतर थोड्या वेळाने काही उत्साही पर्यटक दरवाजा खाली असलेल्या स्थिर पात्रात पोहण्यासाठी उतरले होते. तर, काही पर्यटक स्थिर पात्राच्या भिंतीवरून, वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून चालत होते. अत्यंत धोकादायक ठिकाणी पर्यटक सेल्फी काढण्याच्या नादात वावरत होते. त्यामुळे, या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवणे गरजेचे झाले आहे.  

दरम्यान, महाराष्ट्रातील इतर धरणांवरही मनुष्यबळ कमी असल्याने सुरक्षिततेबाबत काळजी घेतली जात नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

जलसंपदाची कर्मचारी संख्या अपुरी

धरणाचे दरवाजे उघडण्यापूर्वी पंधरा मिनिटे अगोदर सावधानतेसाठी तीन वेळा भोंगा वाजविण्यात आला. परंतु, उत्साही पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन बसतात. अडकलेल्या तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. धरण क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध आहे. जलसंपदाची कर्मचारी संख्या अपुरी असल्याने, पर्यटकांवर लक्ष ठेवणे शक्य होत नाही, असे मत मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अधिकारी सायली पाटील यांनी व्यक्त केले.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com