संगमनेरच्या सभापतीचे कुटुंब भंडारदराजवळील दरीत अडकते तेव्हा... - When the family of the Speaker of Sangamner gets stuck in the valley near Bhandardara ... | Politics Marathi News - Sarkarnama

संगमनेरच्या सभापतीचे कुटुंब भंडारदराजवळील दरीत अडकते तेव्हा...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 जून 2021

पावसाची रिपरिप सुरू झाली. पुढील धोका ओळखून स्थानिक आदिवासींनी त्यांना पुढे न जाण्याचा सल्ला दिला; मात्र सभापती महोदयांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तेच त्यांच्या अंगलट आले.

अकोले : स्थानिकांचा विरोध झुगारून कुटुंबासह सांदण दरीत (Sandandari) जाणे एका नगरसेवकाच्या चांगलेच जिवावर बेतले होते. मात्र, स्थानिक आदिवासी व वन विभागाच्या तत्परतेने हे कुटुंब बालंबाल बचावले. (When the family of the Speaker of Sangamner gets stuck in the valley near Bhandardara ...)

संगमनेरचे नगरसेवक तथा बांधकाम विभागाचे सभापती किशोर टोकसे आपल्या परिवारासह बुधवारी (ता. ९) भंडारदरा परिसरात पर्यटनासाठी गेले होते. धरणाचा परिसर पाहून टोकसे कुटुंब साम्रद येथील सांदण दरी पाहायला गेले. दरीत खोलवर जाण्याचा मोह त्यांना झाला. मात्र, पावसाची रिपरिप सुरू झाली. पुढील धोका ओळखून स्थानिक आदिवासींनी त्यांना पुढे न जाण्याचा सल्ला दिला; मात्र सभापती महोदयांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तेच त्यांच्या अंगलट आले.

पावसाने फेर धरल्याने दरीतील पाणीपातळी वाढू लागली. त्यामुळे टोकसे कुटुंबाभोवती पाण्याचा वेढा पडला. या घटनेची माहिती स्थानिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. हरिश्‍चंद्रगड-कळसूबाई वनक्षेत्राच्या वनरक्षक मनीषा सरोदे, गुलाब दिवे, भाऊसाहेब भांगरे यांनी तत्काळ दरीकडे धाव घेतली. पोहणाऱ्या काही स्थानिकांच्या मदतीने टोकसे कुटुंबाला मृत्यूच्या जबड्यातून सहिसलामत बाहेर काढण्यात आले. दैव बलवत्तर आणि स्थानिकांसह वन विभागाने तत्परता दाखविल्याने टोकसे कुटुंब बालंबाल बचावले.

आततायीपणा बेततोय जिवावर

दर वर्षी पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक भंडारदरा परिसरात येतात. अनेक वेळा प्रशासन व स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने, अतिउत्साही अनेक पर्यटकांना जीवही गमवावा लागलेला आहे. त्यामुळे पर्यटकांनीच स्वयंशिस्त पाळण्याची गरज व्यक्त होत आहे.

हेही वाचा...

काजवा महोत्सव यंदा होणार !

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने वन विभागाने भंडारदरा- कळसूबाई अभयारण्यात कोरोना नियमांचे पालन करत पर्यटकांना मंगळवारपासून (ता. ८) सकाळी सात ते सायंकाळी सातदरम्यान प्रवेश देण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे २५ जुलैपर्यंत पर्यटकांना लखलखणाऱ्या काजव्यांचा निसर्गाविष्कार पाहण्याची संधी तब्बल दोन वर्षांनी मिळणार आहे. या निर्णयाने निसर्गप्रेमी, पर्यटक व स्थानिक आदिवासींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दर वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या व जून महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात भंडारदरा- कळसूबाई अभयारण्याच्या परिसरात काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. पावसाळ्याची चाहूल लागताच अंधारातील काजव्यांची लखलखती दुनिया अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले कळसूबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या दिशेने वळतात. मात्र, यंदा काजवा महोत्सव कोरोनाच्या सावटाखाली होता. परिणामी, तो दुसऱ्या वर्षी रद्द करण्याचा निर्णय वन्य जीव विभागाने घेतला होता.

मात्र, आता राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. राज्य शासनाने निर्बंधही शिथिल केले आहेत. दोन वर्षांपासून वन विभागालाही पर्यटकांच्या प्रवेशशुल्कातून मिळणारे उत्पन्न मिळणे बंद झाले होते. आदिवासींचा रोजगारही बुडत होता. त्यामुळे वन्य जीव विभागाने अभयारण्यात मोजक्याच पर्यटकांना एका वेळी प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. वन विभागाचे वनक्षेत्रपाल डी. डी. पडवळ व परिसरातील गावांच्या सरपंचांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने साडेतीनशे आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा...

कोविडसेंटरमध्ये बांधली लग्नगाठ

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख