नगर : शहरातील काही भाग सध्या कोरोनामुळे हाॅट स्पाॅट आहे. त्याची मुदत उद्या संपत असली, तरी या परिसरात रुग्णसंख्या वाढतच असल्याने हाॅटस्पाॅटमधून हा भाग केव्हा बाहेर येणार, याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.
नगर जिल्ह्यात काल 20 रुग्णांची भर पडली. कोरोनातून बरे झालेल्यांपैकी 19 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. जिल्ह्यात 113 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, आता जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 646 वर गेली आहे. काल पाॅझिटिव्ह सापडलेल्या अहवालामध्ये नगर शहरातील 13 जण आहेत. कर्जत तालुक्यातील 2, शेवगाव, पारनेर, राहुरी, जामखेड या तालुक्यांतील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. नगर शहरातील भराडगल्ली येथे 6, तोफखाना येथे 4, शास्त्रीनगर 1, सातभाई मळा येथील 1 आणि गंजबाजारातील 1 रुग्णाचा समावेश आहे. भिंगार येथील गवळीवाडा येथेही 1 रुग्ण आढळून आला आहे. तसेच राहुरी तालुक्यातील पाथरी बुद्रुक येथी 1, रानेगाव (ता. शेवगाव) येथे 1, जामखेड येथील 1, कर्जत तालुक्यातील माहीजळगाव व पाटेगाव येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथेही रुग्ण आढळून आला आहे.
जिल्ह्यात सर्वात आधी हाॅट स्पाॅट झालेल्या जामखेड तालुका कोरोनामुक्त झाला होता, तथापि, तेथेही आता रुग्ण आढळून येत आहेत. संगमनेर तालुक्याची संख्या रोज वाढत आहेत. यापूर्वी हाॅटस्पाॅट असलेला मुकुंदनगर, अलमगीर हा परिसर मात्र आता कोरोनापासून दूर झाला आहे, ही जमेची बाजू आहे. हाॅटस्पाॅट अनुभवलेल्या तेथील लोकांनी आता स्वतःहून काळजी घेतलेली दिसते.
नगर शहरातील दिल्लीगेट, तोफखाना, चितळेराड, नालेगाव, सिद्धार्थनगर हा परिसर सध्या सील केलेला आहे. त्याला उद्या 14 दिवस होत आहेत. त्यामुळे हा परिसर मोकळा होणार का, याबाबत अद्यापही संदिग्धता आहे. कारण तोफखाना, चितळेरोड, सिद्धार्थनगर आदी परिसरात रुग्णसंख्या वाढत आहे. याबाबत लवकरच प्रशासन निर्णय घेणार आहे.
शेजारील औरंगाबादने आता सात दिवसांसाठी शहरात संपूर्ण लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील निर्णयाचा विचार करून नगर शहरही काही दिवस संपूर्ण लाॅकडाऊन करण्यात यावा, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. यापूर्वी जिल्ह्यातील इतर भागात कोरोनाचे रुग्ण आढळत असताना नगर शहर मात्र अलिप्त होते. मात्र नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे नगर शहरात घुसलेला कोरोना अद्याप बाहेर पडण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे आगामी काळात किती दिवस घरात बसून रहावे लागणार, याबाबत मात्र नागरिकांमध्ये धास्ती वाढत आहे.
नागरिकांनी स्वतः घ्यावी काळजी
दरम्यान, जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, पोलिस प्रशासन शहर कोरोनामुक्तीसाठी कसोसीने प्रयत्न करीत आहे. मात्र नागरिकांनीही आता त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. शहरात अद्यापही दिवसभर नागरिक फिरताना दिसत असून, अनेक ठिकाणी गर्दीही करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता स्वतःहून पुढे येवून स्वतःची काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

