पारनेरच्या त्या पाच नगरसेवकांचे काय होणार, चेंडू अजितदादांच्या कोर्टात? - What will happen to those five Parner corporators, meetings at senior level continue | Politics Marathi News - Sarkarnama

पारनेरच्या त्या पाच नगरसेवकांचे काय होणार, चेंडू अजितदादांच्या कोर्टात?

मुरलीधर कराळे
मंगळवार, 7 जुलै 2020

संबंधित नगरसेवकांची घरवापसी झाल्यास त्यांना पुन्हा शिवसेनेत सन्मानाचे स्थान मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यामुळे त्यांना भाजपचे दरवाजे ठोठावल्याशिवाय पर्याय राहणार नाही.

नगर : पारनेेर नगर पंचायतीच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यपातळीवर उमटले आहेत. राज्याच्या सत्तेत दोन्ही पक्ष असल्याने एकमेकांत फोडाफोडी करू नये, असे संकेत असताना झालेली फोडाफोड नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. याबाबत दोन्हीही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर बैठका झडत आहेत. त्यामुळे या पाच नगरसेवकांची पुन्हा घरवापसी होणार का, याबाबत जिल्ह्याला उत्सुकता आहे.

दरम्यान, त्यांना परत पाठवायचे की नाही, याचे सर्वाधिकार राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेणार असल्याने हा वादाचा चेंडू आता अजितदादांच्या कोर्टात असल्याचे मानले जाते.

पारनेर नगर पंचायतीची निवडणूक आगमी तीन-चार महिन्यांवर आली आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर नगरसेवक फोडाण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. पारनेरचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तोही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. आघाडीचा धर्म पाळण्याचे संकेत डावलून पवार यांनी या नगरसेवकांना पक्षात घेतलेच कसे, हाच मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित नगरसेवक भाजपमध्ये जाणार होते, भाजपची ताकद वाढू नये, म्हणून त्यांना राष्ट्रवादीत घेतल्याचा खुलासा आमदार लंके यांनी केला असला, तरी हे लोकांना रुचले नाही. पवार यांचीही त्यांना पक्षात घेण्याची तयार नव्हती, तथापि, नगरसेवकांच्या आग्रहामुळे पक्षांतर झाले असल्याचेही स्पष्ट झाले. परंतु राजकारणात अशा घडामोडी घडतच असतात, हे सर्वसामान्यांनी जाणून घेतले. 

या घडामोडीत भाजपच्या काही नेत्यांनी मात्र संबंधित नगरसेवक आमच्या संपर्कात नसल्याचे सांगून हात झडटकले. दुसरीकडे शिवसेनेच्या गोटातून शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी संबंधित नगरसेवकांना परत पाठवावे, असा निरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्याचे समजते. याबाबत रात्री उशिरापर्य़ंत घलबते सुरू असल्याचे समजते. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाल्याचे दिसून येत नाही. आज मात्र याबाबत दोन्ही पक्ष काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे.

परत न पाठविल्यास पायंडा पडणार

दरम्यान, या नगरसेवकांची घरवापसी न झाल्यास राज्यात इतर निवडणुकांमध्ये तो पायंडा पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असे चित्र पाहण्यास मिळू शकेल. त्याचा फायदा भाजपला होईल. याचीच भिती दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांना आहे. असा पायंडा पडू नये म्हणून त्यांची घरवापसी करून आपण आघाडीचा धर्म पाळला असे दाखवून द्यावे लागणार आहे. असे झाले तर आगामी निवडणुकांत फोडाफोडीला ब्रेक बसेल.
 

दोन्ही घरचा पाहुणा उपाशी

संबंधित नगरसेवकांची घरवापसी झाल्यास त्यांना पुन्हा शिवसेनेत सन्मानाचे स्थान मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यामुळे त्यांना भाजपचे दरवाजे ठोठावल्याशिवाय पर्याय राहणार नाही. तिकडे भाजपच्या तालुकाध्यक्षांनीही हे नगरसेवक आमच्याकडे आलेच नव्हते, असे सांगितल्याने दोन्ही घरचा पाहुणा उपाशीच राहण्याची शक्यता आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख