व्यापाऱ्यांची खदखद, ग्रामस्थही संतप्त, शनिवारी शिर्डीचे काय होणार?

भाविकांना बाहेर जाण्यासाठी तीन व चार क्रमांकाचे दरवाजे बंद करण्यात आल्याने, साईमंदिराच्या पूर्वेला व दक्षिणेला असलेली बाजारपेठ अक्षरशः ओस पडली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष खदखदतो आहे.
213Saibaba_Shirdi_2H.jpg
213Saibaba_Shirdi_2H.jpg

शिर्डी : साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या स्वागतासाठी काल-परवापर्यंत पुष्पगुच्छ घेऊन जाणारे ग्रामस्थ आता त्यांच्या विरोधात एकवटले आहेत. त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांत बदल केले नाहीत, तर येत्या शनिवारी (ता. 30) "शिर्डी बंद'ची हाक देण्यात आली. मात्र, "आपली भूमिका हटवादी नाही. ग्रामस्थांशी चर्चेची तयारी आहे,' असे बगाटे यांनी आज जाहीर केले. 

भाविकांना बाहेर जाण्यासाठी तीन व चार क्रमांकाचे दरवाजे बंद करण्यात आल्याने, साईमंदिराच्या पूर्वेला व दक्षिणेला असलेली बाजारपेठ अक्षरशः ओस पडली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष खदखदतो आहे. हे दरवाजे भाविकांना बाहेर जाण्यासाठी खुले करावेत, ग्रामस्थांसाठी सुलभ साईदर्शन व्यवस्था करावी, भाविकांसोबतची लहान मुले व ज्येष्ठ मंडळींसाठीही व्यवस्था करावी, या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी "बंद'चा इशारा दिला आहे. 

बगाटे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत, सध्याची दर्शन व्यवस्था पूर्वीपेक्षाही उत्तम असल्याचे सांगून अभिनेते, मंत्री, काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दर्शन व्यवस्थेची प्रशंसा केल्याचा दावा केला. मुळातच या मंडळींना दर्शन पास मिळविण्यासाठी रांगेत तिष्ठत उभे राहावे लागत नाही. त्यामुळे त्यांना सगळेच उत्तम वाटत असते. 

पूर्वी दिवसभरात लाखभर भाविक दर्शन घ्यायचे. आता कोविडमुळे ही संख्या दहा-वीस हजारांवर आली आहे. साहजिकच, निवांत दर्शन होते. त्यात नवल ते काय? मात्र, गर्दीच्या काळात दर्शन पास मिळविताना सामान्य भाविकांची होणारी दमछाक आणि पासचा काळाबाजार याची जबाबदारी कोणी घ्यायची? पंचक्रोशीतील पायी वारी करणाऱ्या भाविकांनी या त्रासापायी कळसाचे दर्शन घेण्याचा मार्ग पत्करला. त्यांची व्यथा कोणी जाणून घ्यायची? गर्दीच्या काळात सुलभ दर्शन व्यवस्था करता आली, भाविकांची दमछाक टाळता आली, तर त्यात खरे कौशल्य आहे. गेल्या अडीच महिन्यांत गर्दीच्या काळात असे चित्र एकदाही पाहायला मिळाले नाही. 

अडीच महिन्यांची फुरसत असताना, केवळ उच्च न्यायालयाची परवानगी वेळेत मिळविता आली नाही, या एकाच कारणास्तव यंदाची डायरी व दिनदर्शिका नव्या वर्षाचा पहिला महिना संपला तरी प्रदर्शित झाली नाही. साईसंस्थानच्या दोन्ही रुग्णालयांत रुग्णांची हेळसांड होते. डॉक्‍टर मंडळी सोडून चालली आहेत. कधी औषधांचा तुटवडा, तर कधी डॉक्‍टर भेटतील याची शाश्वती नाही. त्याकडे कोणी पहायचे? जवळपास प्रत्येक विभागात खूप काही करण्यासारखे आहे. 

पूर्वी शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांना साईमंदिरात जाण्यासाठी गावकरी दरवाजा होता. कोविडमुळे तो बंद करावा लागला, हे समजण्यासारखे आहे. मात्र, जाचक नियमावली करून साईदर्शन गुंतागुंतीचे करून काही साध्य होणार नाही. कारण, कधी ना कधी नवे मंडळ अधिकारावर येईल. त्यात दोन-चार तरी ग्रामस्थ असतील. ते सध्याची जाचक पद्धत मागे घेतील. 

सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या बैठकीस साईसंस्थानचे माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, शिवसेनेचे कमलाकर कोते, संजय शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रमेश गोंदकर, संदीप सोनावणे यांच्यासह व्यापारी मंडळीदेखील उपस्थित होती. 

ग्रामस्थांनी समिती नेमून साईदर्शन व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करावे. भाविकांना बाहेर पडण्यासाठी अन्य दरवाजे खुले करण्याची आपली तयारी आहे. ऑनलाइन पास मिळविण्याबाबतच्या त्रुटी दूर केल्या जातील. कोविडमुळे दर्शन व्यवस्थेत बदल झाले. त्यामुळे निर्माण झालेला असंतोष समजू शकतो. मी संवेदशनशीलतेने याकडे पाहतो. 
- कान्हूराज बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईसंस्थान, शिर्डी 

विनाकारण संघर्ष किंवा आंदोलन करण्याची ग्रामस्थांची मानसिकता नाही. चर्चेने प्रश्न सुटला तर चांगले होईल. साईमंदिर परिसरात आले, की मंत्रालयात आल्यासारखे वाटते. ग्रामस्थांवर अशी वेळ कधीच आली नव्हती. पंचक्रोशीतील भाविकदेखील फार नाराज आहेत. कोविडच्या नावाखाली साईदर्शन अवघड करण्यात आले. आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांना आम्ही साकडे घालू. शेवटचा पर्याय म्हणून आंदोलन हाती घेऊ. 
- अभय शेळके, माजी उपनगराध्यक्ष, शिर्डी 

Edited By  - Murlidhar karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com