साईबाबांच्या शिर्डीला झाले तरी काय? एक वाद मिटला, दुसरा सुरू - What happened to Sai Baba's Shirdi? One argument is settled, another continues | Politics Marathi News - Sarkarnama

साईबाबांच्या शिर्डीला झाले तरी काय? एक वाद मिटला, दुसरा सुरू

सतीश वैजापूरकर
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

बगाटे यांनी संस्थानमध्ये काही तरी चांगले काम करून दाखविण्याची इच्छा आहे. मात्र सर्वांना सोबत न घेतल्याने, कटुता निर्माण होते. 

शिर्डी : साई मंदिर परिसराचे तिन व चार क्रमांकाचे दरवाजे भाविकांना बाहेर जाण्यासाठी खुले करण्यात आले. पाठोपाठ आज ग्रामस्थांसाठी दर्शनाची सुलभ व्यवस्था सूरू करून साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी एक सकारात्मक पाऊल पुढे टाकले. एक वाद शमत नाही तोच एका वृत्तवाहिनीच्या दोन प्रतिनीधींवर त्यांनी दोन महिन्यांतर काल सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केल्याने आणखी एक नवा वाद निर्माण झाला. 

बगाटे यांनी संस्थानमध्ये काही तरी चांगले काम करून दाखविण्याची इच्छा आहे. मात्र सर्वांना सोबत न घेतल्याने, कटुता निर्माण होते. गेल्या दोन महिन्यात ग्रामस्थांचे सुलभ दर्शन बंद झाले. त्यामुळे त्यांनी संघटीत होऊन शिर्डी बंद चा इशारा दिला.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थी केली. पाठोपाठ बगाटे यांनी ग्रामस्थांसाठी मंदिराचे दरवाजे खुले केले. ग्रामस्थ व पत्रकारांसाठी ते पूर्वीप्रमाणे खुले ठेवले असते तर हे वाद टळले असते. 

दोन महिन्यांपूर्वी साईदर्शनासाठी मंदिर खुले झाले. पहिल्याच दिवशी माध्यम प्रतिनीधी आणि बगाटे यांचे वाद झाले. त्यांनी स्वतः पुढे होऊन पत्रकारांना मंदिर परिसरा बाहेर काढले. पत्रकारांनी धरणे आंदोलन केले, चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या. तरीही माध्यम प्रतिनीधींना मंदिर परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला. उलट पत्रकारांसाठी नियमावली केली. त्यातील माध्यम प्रतिधींनी मंदिर परिसरा बाहेर काढण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिका-यांना असेल.या वादग्रस्त कलमाने माध्यम प्रतिनीधींच्या जखमेवर मिठ चोळले गेले. 

ज्या प्रतिनीधीला या वादाची अधिक झळ बसली, त्यांच्या वृत्तवाहिनीने दोन दिवसांपूर्वी बातमी प्रसिध्द केली. या बातमीत बगाटे यांचा वादग्रस्त विशेषण लावून उल्लेख केला. त्यानंतर तातडीने संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी या दोन माध्यम प्रतिनीधींच्या विरोधात तब्बल दोन महिन्यां नंतर काल सायंकाळी सरकारी कामात अडथळा आणला, अशी फिर्याद दाखल केली. ग्रामस्थांसोबतचा वाद मिटला आणि माध्यम प्रतिनीधीं सोबत नवा वाद सुरू झाला. 

साई मंदिर हे अध्यात्मिक केंद्र आहे. जिल्हा परिषद किंवा मंत्रालय नाही. हे लक्षात घेऊन दर्शन व्यवस्था सुरू ठेवायला हवी होती. दररोज विस हजार भाविक दर्शन घेतात. मग शे दोनशे ग्रामस्थ आणि पाच दहा इलेक्ट्रानीक्स प्रसार माध्यमांचे प्रतिनीधींची त्यात भर पडली तर काही बिघडत नाही. 

गर्दिच्या काळात मंदिर परिसराबाहेर सुरू दर्शनपासचा काळाबाजार व रेटारेटी सहन न करता व्हीआयपी मंडळी सुलभ दर्शन घेतात. त्यांच्या अभिप्रायाच्या चित्रफिती तयार करून त्या प्रसिध्दीस देण्यात बगाटे यांचा मोलाचा वेळ खर्च होतो. हटवादी भुमिका सोडून, माध्यम प्रतिनीधींना मंत्री व सिलेब्रिटींच्या मुलाखती घेण्यासाठी विशेष व्यवस्था तातडीने करायला हवी. हा चित्रफिती पाठविण्याचा निरर्थक प्रकार बंद करायला हवा. तसे झाले तर माध्यमां सोबत होणारे वाद कायमचे थांबतील. दरम्यान, या प्रकरणाबाबत महराष्ट्रभर चर्चा होत आहे. भारत देशातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्धी असलेल्या या देवस्थानामध्ये असे वाद होऊ लागल्याने भाविकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख