काय झाकण्यासाठी तुम्ही पक्ष बदलले? राजेंद्र नागवडे यांचा शेलारांवर प्रतिहल्ला - What did you change sides to cover? Rajendra Nagwade's counter-attack on Shelar | Politics Marathi News - Sarkarnama

काय झाकण्यासाठी तुम्ही पक्ष बदलले? राजेंद्र नागवडे यांचा शेलारांवर प्रतिहल्ला

संजय आ. काटे
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

कारखान्यात कुठलाही गैरव्यवहार नाही. जे आरोप करतात, तेही तेथे संचालक आहेत. त्यांनी संचालकांच्या बैठकीत एकदाही याबाबत साधी चर्चाही केली नाही.

श्रीगोंदे : "नागवडे कारखान्याचा कारभार पारदर्शी आणि बापूंच्या विचारांवरच सुरू आहे. केवळ निवडणूक आली म्हणून विरोधकांचा पोटशूळ उठला आहे. माझ्या पक्षबदलावर चर्चा करणारे अण्णा शेलार हे नेमक्‍या कोणत्या पक्षात, कुणाच्या गटात आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. त्यांनी अनेक वेळा पक्ष बदलले. त्यांना नेमके काय झाकायचे होते,'' असा प्रतिहल्ला नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केला. 

शेलार यांच्या आरोपांबाबत नागवडे म्हणाले, "कारखान्यात कुठलाही गैरव्यवहार नाही. जे आरोप करतात, तेही तेथे संचालक आहेत. त्यांनी संचालकांच्या बैठकीत एकदाही याबाबत साधी चर्चाही केली नाही. ज्यांना तेथील कारभार माहिती आहे, त्यांनी संचालकांच्या बैठकीत किमान चर्चा तरी करावी. मात्र, निवडणूक आली की बिनबुडाचे आणि प्रसिद्धीसाठी आरोप करायचे, ही त्यांची पद्धत आहे. मुळात माझ्यावर पक्षबदलाचा आरोप करणारे शेलार हेच नेमके कोणत्या पक्षात आहेत, हे त्यांनी सांगावे. ते तर रोज पक्ष बदलत असतात. त्या वेळी त्यांना काय बाहेर येऊ द्यायचे नसते, याचाही खुलासा करावा.'' 

हेही वाचा...भाजपचे आता युवा वाॅरिअर्स

कारखान्याचा कारभार कायमच बापूंच्या विचारांवर चालणार असल्याचे सांगत नागवडे म्हणाले, ""कारखान्याच्या सगळ्या निविदा ऑनलाइन होतात. त्यामुळे पाकिटे घरी फोडण्याचा आरोप हास्यास्पद आहे. माझ्याकडे कारखान्याचा कारभार येऊन एक वर्षच झाले आहे. कारखान्याच्या कारभारावर जे आरोप करीत आहेत, ते संचालक असल्याने त्यांनी याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. केवळ निवडणूक समोर ठेवून असे आरोप सुरू आहेत.'' 

 

हेही वाचा...

पाटपाणी कृती समितीचे श्रीगोंद्यात धरणे 

श्रीगोंदे : कुकडी प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या उन्हाळी आवर्तनातून तेरा दिवस तालुक्‍याला पाणी मिळावे, महा वितरणने सुरू केलेली कस्तीची वीजबिल वसुली थांबवावी, या मागण्यांसाठी पाटपाणी कृती समितीच्या सदस्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. 

समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के, सचिव माऊली मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा... दुर्गा तांबे यांनी जोपासला जात्यावरच्या ओव्यांचा छंद

म्हस्के म्हणाले,  की कुकडी प्रकल्पातून शेतीला मिळणारे एकमेव आवर्तन सध्या सुरू आहे. श्रीगोंद्याच्या वाट्याला पाणी मिळण्यास अजून काही दिवस अवधी असला, तरी हे पाणी केवळ नऊ दिवस मिळणार आहे. त्यामुळे मोठे क्षेत्र सिंचनाअभावी राहणार आहे. जलसंपदा विभागाने तेरा दिवस तालुक्‍याच्या हद्दीत पाणी द्यावे. एकीकडे आवर्तन आला कात्री लावली जात असताना दुसरीकडे मात्र नियमबाह्य पद्धतीने पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील नदीवरील बंधारे भरण्यासाठी दोन टीएमसी पाणी वापरले जाणार आहे. त्यामुळे हाच निकष येथे लावून श्रीगोंदयातील पाझर तलाव भरले जावेत. डिंबे ते माणिकडोह हा बोगदा आवश्‍यक असून त्याचे काम तातडीने सुरू करावे आदी मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन केले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख