What did the state government provide for Corona? | Sarkarnama

कोरोनाबाबत केंद्राने निधी दिला, राज्य सरकारने काय दिले ?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 19 मे 2020

सरकारच्या अकार्यक्षम धोरणांमुळे राज्यातील कोरोनाचा विळखा आणि मृत्युंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याने स्वत: कोणतीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही.

नगर : कोरोनाबाबत केंद्र सरकारने निधी दिला, महाराष्ट्र राज्य सरकारने काय दिले?  असा प्रश्न करीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र बचाव आंदोलन केले. राज्य सरकार पूर्ण अपयशी ठरल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सरकारच्या अकार्यक्षम धोरणांमुळे राज्यातील कोरोनाचा विळखा आणि मृत्युंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याने स्वत: कोणतीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. 
केंद्र सरकारने केलेल्या मदतीवर आभार व्यक्त न करता फक्त टीका करण्यात हे सरकार धन्यता मानत आहे. सरकारला लवकरात लवकर जाग यावी, आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, यासाठी भाजपातर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन छेडण्यात आले.
हे आंदोलन शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी माजी खासदार दिलीप गांधी, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, महापौर बाबासाहेब वाकळे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शामराव पिंपळे, विवेक नाईक, वंसत लोढा, सचिन पारखी आदि उपस्थित होते.

हेही वाचा...

"कोविड'साठी पॅकेज जाहीर करा : कोल्हे 

कोपरगाव : कर्नाटक, हरियाना, गुजरात, दिल्ली, केरळ या राज्यांनी कोविड-19वर पॅकेज जाहीर केली. त्याच धर्तीवर राज्य सरकारनेही पॅकेज जाहीर करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन शहर व तालुका भाजपतर्फे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिले. 

भाजपचे प्रांतिक सदस्य विधिज्ञ रवींद्र बोरावके यांनी प्रास्ताविक केले. गटनेते रवींद्र पाठक, शहराध्यक्ष कैलास खैरे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची तीन महिन्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी. शेतकरी, व्यापारी व सामान्य नागरिकांनी घेतलेल्या कर्जावरील सहा महिन्यांचे व्याज माफ करावे. स्थानिक बाजारपेठा सम-विषम तारखेनुसार सुरू कराव्यात, 2014-19 या काळात मतदारसंघातील मंजूर रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत. 

कोरोनाविरोधात लढण्यासाठी केंद्र शासनाने वेळोवेळी जी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली, ती अंमलात आणण्यात राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. कोरोना महामारी दूर करण्यासाठी प्रत्येक जण संघर्ष करतो आहे. मात्र, राज्यात आरोग्य सुविधांचा अभाव आहे, याचा भाजप तीव्र शब्दांत निषेध करीत आहे. पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताण येऊन त्यांचे हकनाक बळी जात आहेत, परप्रांतीय मजुरांना सोडण्यासाठी पुरेशी वाहने नाहीत, महाविकास आघाडी शासन आणि प्रशासनात समन्वयाचा अभाव आहे. त्यातून कोरोना रुग्णांचे प्रमाण शहरी भागात प्रचंड वाढत आहे, हे लोण आता थेट ग्रामीण भागात वाढू लागले आहे. तेव्हा शासनाने प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेऊन रुग्णांना व सामान्य नागरिकांना दिलासादायक काम करावे, असे आवाहन कोल्हे यांनी केले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख