On the way to independence in Jamkhed municipality | Sarkarnama

जामखेडच्या नगराध्यक्षांची गुगली ! राम शिंदेंची सत्ता आमदार रोहित पवारांच्या पारड्यात पडणार

वसंत सानप
सोमवार, 15 जून 2020

नगराध्यक्षांनी राजीनामा देण्याऐवजी राजकीय 'गुगली' टाकून दहा नगरसेवकांसह आमदार रोहित पवारांचे नेतृत्व स्विकारुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.

जामखेड : जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षाला राजीनामा देण्याचे दिलेले निर्देश माजी मंत्री राम शिंदे यांच्या अंगलट आले आहे. नगराध्यक्षांनी राजीनामा देण्याऐवजी राजकीय 'गुगली' टाकून दहा नगरसेवकांसह आमदार रोहित पवारांचे नेतृत्व स्विकारुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. तसेच स्वतःची सत्ता व खुर्ची कायम ठेऊन शिंदे यांच्या हाती असलेली सत्तेची सूत्रेच काढून घेतली आहेत. हा माजी मंत्री शिंदे यांना मोठा राजकीय धक्का, तर आमदार रोहित पवारांसाठी राजकीय उंची वाढविणारा सुखद धक्का ठरला आहे.

नगराध्यक्ष निखील घायतडक यांना मागील आठवड्यात नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यासाठी राजकीय दबाव निर्माण झाल्याचे त्यांनी जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. त्याचवेळी नगराध्यक्ष घायतडक यांनी आपण नगराध्यक्षपद तसेच  नगरसेवकपदाचा राजीनामा देणार असल्याचेही जाहीर केले. तसेच घायतडक यांनी आपल्याकडे दहा नगरसेवकांनी नगरसेवक पदाचे राजीनामे दिल्याचेही सांगितले.

याकडे भाजपने व माजी मंत्री शिंदे यांनी दुर्लक्ष केले. घायतडक यांचे बोलणे गांभीर्याने घेतले नाही. मात्र राजकारणात पक्क्या गुरुचा पक्का चेला असलेल्या घायतडक यांनी राजीनाम्याचे सोडाच, थेट पालिका सत्तांतराच्या उंबरठ्यावर नेहून ठेवली. जामखेड नगरपालिकेच्या सत्तेची सूत्रे माजी मंत्री राम शिंदे यांच्या हाती होती. मात्र त्यांनी नगराध्यक्षाला राजीनामा देण्याचे निर्देश दिले आणि मोठी राजकीय घडामोडी होऊन येथील एक हाती सत्तेला 'सुरुंग' लागला आणि शिंदे यांच्या हातून नगरपालिकेची सत्ता अलगदपणे आमदार रोहित पवारांच्या हाती देऊ केली. हा माजी मंत्री राम शिंदे यांना मोठा राजकीय धक्का मानला जातो आहे.

कर्जत - जामखेड विधानसभा मतदार संघात माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून रोहित पवार आमदार झाले. त्यांनी आमदार झाल्यापासून तळगाळातील लोकांशी थेट संपर्क वाढविला आणि एक-एक संस्था स्वतःच्या ताब्यात घेतली, तर काही संस्थांच्या सत्ता राम शिंदेंच्या राजकीय चुकांमुळे  आमदार रोहित पवारांना सहजपणे  मिळाल्या आहेत.  याचे उत्तम उदाहरण जामखेडची नगरपालिका ठरली आहे, हे मात्र निश्चित !

तीन वर्षापूर्वीच्या सत्तांतर नाट्याची झाली पुनरावृत्ती 

जामखेडच्या नगरपालिकेच्या स्थापनेनंतर येथील सत्ता माजी मंत्री सुरेश धस यांच्या हाती होती. त्यावेळी राम शिंदे मंत्री होते. त्यावेळी येथील विकास कामांमध्ये मोठे राजकारण झाले. राज्यात सत्ता नसल्याने नगरपालिकेच्या कामकाजाची कोंडी होत असल्याचे कारण पुढे करुन नगरसेवकांच्या एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करुन भाजपचे कमळ हाती घेतले. नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे आवघे तीन नगरसेवक निवडून आणलेल्या राम शिंदे यांच्या हाती नगरपालिकेच्या सत्तेची चावी स्वतः होऊन नेहून दिली. तसाच प्रकार पुन्हा उघडला. माजी मंत्री राम शिंदे यांची राजकीय खेळी चुकली आणि नगराध्यक्ष घायतडक यांच्या राजीनाम्याऐवजी पक्षांतराचा मोठा झटका शिंदे यांना बसला. नगराध्यक्षासह दहा नगरसेवक भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांच पंचवर्षीक काळात पालिकेला दुसऱ्यांदा राजकीय भूकंप अनुभवास मिळणार आहे, हे मात्र निश्चित !

त्यांचे राष्ट्रवादीत स्वागत ः रोहित पवार

मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे विचाराचे असणारे हे सर्व नगरसेवक मधल्या काही काळामध्ये भाजपसोबत गेले होते. ते परत एकदा स्वच्छेने राष्ट्रवादीसोबत येण्यास इच्छुक असतील, तर पक्षाचा आमदार म्हणून मी त्यांचे स्वागत करील. राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये परतले, काही नगरसेवक यापैकी ज्यांची प्रतिमा स्वच्छ आहे व जे सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून कार्य करतात, त्यांना मी ताकद देईल. जे लोक निवडणुकीच्या काळात माझ्यामागे राहिले, मला सहकार्य केले, त्यांचे योगदान माझ्यासाठी कायमच महत्त्वाचे राहील, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख