Water to Shrigonda first! The result of MLA Pachpute's agitation | Sarkarnama

आधी श्रीगोंद्याला पाणी ! आमदार पाचपुते यांच्या आंदोलनाचे फलित

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 जून 2020

कर्जतचे पाणी आम्हाला नको, पण तालुक्यातच होणारी चोरी थांबवून तेच पाणी सामान्यांच्या शेतात द्या, ही आमदार बबनराव पाचपुते यांची मागणी मान्य करीत `कुकडी`च्या अधिकाऱ्यांनी लेखी दिल्याने आजपासून सुरु केलेले उपोषण मागे घेतले.

श्रीगोंदे : कुकडी प्रकल्पातून आवर्तन सुरु झाल्यावर श्रीगोंद्यातील पायथ्याच्या वंचीत भागाला प्राधान्याने पाणी द्या. त्यासाठी करमाळा, कर्जतचे पाणी आम्हाला नको, पण तालुक्यातच होणारी चोरी थांबवून तेच पाणी सामान्यांच्या शेतात द्या, ही आमदार बबनराव पाचपुते यांची मागणी मान्य करीत `कुकडी`च्या अधिकाऱ्यांनी लेखी दिल्याने आजपासून सुरु केलेले उपोषण मागे घेतले.

`कुकडी`चे आवर्तन लगेच सुरु करुन अगोदर श्रीगोंदे व नंतर खालच्या भागाला पाणी देण्याच्या मागणीसाठी आमदार पाचपुते यांनी आज येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. राष्ट्रवादीचे नेते प्रा. तुकाराम दरेकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, माजी पंचायत समिती सदस्य गणपत काकडे, अनुजा गायकवाड, सुवासिनी गांधी उपोषणात सहभागी झाले होते. कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे व तहसीलदार महेंद्र माळी यांनी पाचपुते यांना शनिवारी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून, उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

पाचपुते म्हणाले, ``कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पत्र देवून कसे नियोजन करायला हवे हे सुचविले होते. मात्र आपल्या पत्राचे साधे उत्तरही दिले नाही. दरवेळी श्रीगोंद्यावरच अन्याय होणार असेल, तर सहन केला जाणार नाही. श्रीगोंद्याच्या हद्दीत मिळणाऱ्या पाण्याची हद्द संपताना मोठी घट होती. हे पाणी कुठे जाते कोण चोरते याची प्रशासनाला चांगलीच माहिती आहे. मात्र त्याकडे डोळेझाक होत असून, तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होतो.``

पिंपळगावजोगे धरणातून आवर्तन जाणीवपुर्वक उशिरा सोडले, त्यामुळे येडगावमध्ये तेथील पाणी मिळण्यास उशिर होतोय. हाच मुद्दा आपण पत्रात नोंदविला, मात्र त्याची दखल घेतली नाही. कुणाचे नको आमच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. हा विषय आपण विधानसभेतही मांडणार आहोत. त्याचा कुणाला त्रास झाला तरी चालेल, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रा. दरेकर म्हणाले, ``पुर्व भागातील वितरीका लगेच सोडा. त्यासाठी पाण्याची चोरी बंद करा. सध्याच्या सरकारमधील मंत्र्यांच्या जवळ बसणाऱ्या काही लोकच पाण्याची चोरी करतात. त्यांना एकदा वठणीवर आणा.``

विसापुरचे आवर्तन बुधवारपासून

कुकडीचा मार्ग निघाला, मात्र विसापुरचा प्रश्न चिघळत ठेवला जातो. हा आरोप गणपतराव काकडे यांनी केला. पाचपुते यांनी अधिकारी काळे यांना विसापुरचे पाणी लगेच सोडा, असा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष या नात्याने आदेश केला. त्यावर विसापुरच्या कालव्यातून पाण्याची चोरी करणारे पाईप दोन दिवसात काढून बुधवारपासून आवर्तन सुरु करण्याची हमी दिली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख