म हाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे, राष्ट्रीय राजकारणात ज्यांनी अढळ स्थान निर्माण केले, ज्यांना ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकरी, शेतमजुरांसह समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे, असे मुत्सद्दी व्यक्तिमत्त्व म्हणून ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची देशभर ओळख आहे.
माझ्यासारखे अनेक तरुण आमदार, विविध पक्षांच्या राजकीय पदाधिकाऱ्यांना पवार यांच्याकडून नेहमीच काही तरी शिकायला मिळते. त्यांच्या सहवासात जो जाईल, त्याला नवी ऊर्जा मिळते. एखादा प्रश्न कसा सोडवावा, याची दृष्टी मिळते. कर्मवीर शंकरराव काळे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारासाठी मोठे योगदान दिले. पवार यांनी या संस्थेत जबाबदारीचे पद देऊन माझ्यावर विश्वास व्यक्त केला. या विश्वासाची शिदोरी सोबत घेऊन मी वाटचाल करीत आहे. रयत शिक्षण संस्थेसाठी वेळ देतो आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संस्थेसाठी काम करीत राहणार आहे.
कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, साठवण तलावाची क्षमता कमी पडत असल्याने गंभीर झाला. ते माझ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोपरगावात आले. मी त्यांना हा प्रश्न समजावून सांगितला. त्यांनी प्रचारसभेत तो मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या पाठबळामुळे व कोपरगाव मतदारसंघातील जनतेच्या विश्वासामुळे मला विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. पुढे त्यांनी समृद्धी महामार्गाच्या ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून घेतले. त्यांना सूचना केली, त्यानंतर पाच क्रमांकाच्या साठवण तलावाच्या खोदाईचे काम बरेचसे पूर्णत्वाला गेले. देशापुढील पेचप्रसंग सोडविणारे पवार साहेब ज्या वेळी माझ्यासारख्या तरुण आमदाराच्या विनंतीवरून एखाद्या साठवण तलावाचे काम मार्गी लावण्यासाठी वेळ देतात, त्या वेळी त्यांच्या मनाचा मोठेपणा लक्षात येतो. कोपरगावच्या पाच क्रमांकाच्या साठवण तलावाचे काम पूर्ण होईल. कोपरगाव शहराची पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमची दूर होईल. तो दिवस आता दूर नाही. मात्र, हे सर्व त्यांच्याच पाठबळामुळे शक्य होणार आहे, याची आम्हा सर्वांना जाणीव आहे.
कारखानदारीचे आधारस्तंभ
सहकारी साखर कारखानदारीमुळे राज्यात ठिकठिकाणी विकासाची बेटे तयार झाली. जे कारखाने चांगले चालले, त्यांच्यामुळे त्या-त्या भागात सुबत्ता आली. नव्या पिढ्या उच्चशिक्षित झाल्या. आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनही झाले. राज्य आणि केंद्र सरकारला उत्पन्नाचा मोठा स्रोत निर्माण झाला. या सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ म्हणून पवार साहेबांकडे पाहिले जाते. राज्यात आणि केंद्रात कुठल्याही पक्षाचे सरकार असले, तरी साखर उद्योगाच्या समस्या मार्गी लावण्यात त्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली. या उद्योगाचे मार्गदर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
नगर आणि नाशिक जिल्ह्यांत द्राक्षे आणि डाळिंबे यांसारख्या फळबागांमुळे क्रांती झाली. द्राक्षबागायतदार संघ असो, की डाळिंबउत्पादक संघ, त्यामागे पाठबळ पवार साहेबांचेच असते. फळबागांवरील कीड व रोगांचे संशोधन करण्यासाठी प्रयोगशाळेची उभारणी, देशांतर्गत बाजारपेठ, निर्यातीच्या संधी, त्यातील अडचणी सोडविणे या सर्व जबाबदाऱ्या ते स्वतःकडे घेतात. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळायला हवी.
शेतकरी हायटेक व्हावा, त्याने रोजगारनिर्मिती करून त्या-त्या भागाच्या विकासाला चालना द्यावी, यासाठी ते सतत आग्रही असतात. महाराष्ट्र हे देशातील एक अग्रेसर राज्य आहे. येथील औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषिविषयक प्रश्नांची जाण पवार साहेबांना आहे. राज्यात कुठलाही प्रश्न किंवा समस्या निर्माण झाली, की पहिल्यांदा त्यांच्याकडे धाव घेतली जाते. केंद्रात जायचे असेल, तर त्यांनाच साकडे घातले जाते.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले, त्यामागे पवार साहेबांनी आखलेली व्यूहरचना कारणीभूत ठरली. जनतेच्या हिताची धोरणे राबविण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला प्रोत्साहन दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लोकहिताचे निर्णय घेतले. त्याचे प्रतिबिंब पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकार मजबूत झाले. आर्थिक अडचणीचा काळ असतानाही महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वास संपादन केला.
त्यांच्याकडून मिळते प्रेरणा आणि उर्जा
कोविडचा प्रकोप सुरू झाला. सुरवातीला संपूर्ण देशभर लॉकडाउन होते. भीतीचे वातावरण होते. त्यानंतर अतिवृष्टीचे संकट आले. वयाच्या 80व्या वर्षी, प्रकृतीची तमा न बाळगता पवार साहेब राज्यभर शेतकऱ्यांना दिलासा देत फिरले. विविध शहरांना भेटी देऊन त्यांनी कोविड रुग्णालयांची पाहणी केली. त्यांचे हे झंझावाती दौरे पाहून माझ्यासारख्या तरुण आमदारांनाही मोठी प्रेरणा मिळाली. आम्ही तरुण आमदारांनीदेखील या काळात प्रत्येक दिवस मतदारसंघातील जनतेसोबत घालविला. सर्वांना धीर दिला. कोविड उपाययोजनांमध्ये सुसूत्रता आणली. आवश्यक तेथे तत्परतेने मदत पोचविली. अतिवृष्टी झाली, त्या वेळीही तेथे धाव घेतली. लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्या तत्परतेने मार्गी लावल्या. पवार साहेबांकडून मिळत असलेली प्रेरणा व ऊर्जा याचा हा परिणाम आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
पावसातील ती सभा आठवणीची
महाराष्ट्रातील प्रत्येक गावात साहेबांचा प्रत्यक्ष परिचय असलेले कार्यकर्ते आहेत. त्यांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक वेळा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. ते केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशातील एक अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात. देशातील मागील विधानसभा निवडणुकीत त्यांचे अचंबित करणारे रूप देशभरातील जनतेने पाहिले. धो धो पाऊस कोसळत असताना, एका जाहीर सभेत साहेब समोर बसलेल्या लोकांसोबत संवाद साधत होते. या सभेने राज्यातील वातावरण पुरते बदलून गेले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये उत्साह संचारला. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा राज्यातील सत्ताधारी पक्ष आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे समर्थपणे राज्याचा गाडा चालवीत आहेत. त्यांच्यामागे पवार यांच्या अनुभवांचे पाठबळ आहे.
बारामती माॅडेल
ते केंद्रात कृषिमंत्री असताना, देशाने सर्वाधिक अन्नधान्याची निर्यात केली. शेतमालाला चांगला भाव मिळावा, यासाठी त्यांनी सतत शेतकरीहिताची पाठराखण केली. राज्यात ते ज्या-ज्या वेळी मुख्यमंत्री झाले, त्या-त्या वेळी त्यांनी महाराष्ट्राला प्रगतीची वाट दाखविण्याचे काम केले. त्यांनी विकसित केलेले बारामती मॉडेल पाहण्यासाठी देशभरातील जाणकार मंडळी बारामतीला येतात. राज्यात आणि देशाच्या राजकारणात ते सध्या महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते म्हणून कार्यरत आहेत.
विविध राजकीय पक्षांच्या विचारधारा आणि तत्त्वे वेगवेगळी असली, तर बऱ्याचदा त्या बाजूला ठेवून या सर्वांना एकत्र यावे लागते. अशा वेळी सर्वसमावेशक नेत्याची भूमिका महत्त्वाची ठरते. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची क्षमता असलेले सर्वसमावेशक राष्ट्रीय नेते म्हणून देश पवार साहेबांकडे पाहतो.
- लेखक - आमदार आशुतोष काळे
(अध्यक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सह. साखर कारखाना, कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. नगर)
(शब्दांकन - सतीश वैजापूरकर)
Edited By - Murlidhar Karale