The water of 'Kukadi' is leaking due to someone, thanks to Petla! | Sarkarnama

आता तुम्हीच सांगा पाव्हणं, कुणी आणलंय `कुकडी`चं पाणी

संजय आ. काटे
रविवार, 31 मे 2020

सुटणारे हे पाणी कोणत्या नेत्यांमुळे सुटतेय, यावरुन सोशल मिडीयात खल सुरु आहे. जो तो आपल्याच नेत्यामुळे पाणी सुटल्याचे घोडे पुढे करीत असल्याने श्रीगोंद्यात पाण्याच्या श्रेयावरुन नेहमीप्रमाणे गंमत पाहायाला मिळत आहे.

श्रीगोंदे : आठमाही असणाऱ्या कुकडी प्रकल्पात यंदा पहिल्यांदाच उन्हाळ्यात दोन आवर्तने सुटणार आहेत. पाणी सोडण्याची तारीख निश्चित केली असली, तरी ते कुठल्या तालुक्याला किती मिळणार, हे गुलदस्त्यात आहे. दरम्यान सुटणारे हे पाणी कोणत्या नेत्यांमुळे सुटतेय, यावरुन सोशल मिडीयात खल सुरु आहे. जो तो आपल्याच नेत्यामुळे पाणी सुटल्याचे घोडे पुढे करीत असल्याने श्रीगोंद्यात पाण्याच्या श्रेयावरुन नेहमीप्रमाणे गंमत पाहायाला मिळत आहे.

कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून येत्या शनिवारी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी दिली. त्यांनी पाणी सोडण्याची तारीख जरी जाहीर केली असली, तरी ते कसे सोडणार, कुठल्या धरणाचा किती अचलसाठा येडगावमध्ये घेणार व त्यांनतर जुन्नर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व करमाळा तालुक्यांच्या वाट्याला नेमके किती पाणी येणार, याची माहिती मात्र त्यांनी उघड केली नाही. ज्या अर्थी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली, त्यामुळे सुटणारे आवर्तन हे शेतीसाठीच राहिल, असे एका जबाबदार अधिकाऱ्याने खासगीत सांगितले.

आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी माजीमंत्री राम शिंदे व बबनराव पाचपुते यांनी दोघांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांचा इशारा आला, त्याचवेळी कालवा सल्लागार समितीचे सदस्य दुसऱ्यांदा बैठक घेत होते. बैठकीतील निर्णय दुसऱ्या दिवशी सांगितला गेला आणि त्यानंतर कुणामुळे पाणी सोडण्याचा निर्णय झाला, यावरुन सोशल मिडीयातील वाॅर पेटले. पाचपुते व शिंदे यांच्या इशाऱ्यापुढे सरकार झुकले आणि पाण्याचा निर्णय घ्यावा लागल्याची पोस्टरबाजी सोशल मिडीयात झाली. त्याचवेळी राष्ट्रवादी समर्थकांनी त्यांचे नेते माजी आमदार राहुल जगताप तसेच घन:शाम शेलार व आमदार रोहित पवार यांनी आवर्तनाबाबत दिलेल्या निवेदनामुळे आवर्तन सोडण्यात आल्याच्या पोस्ट व्हायरल केल्या. राजकीय श्रेयवादात पाण्याचे नियोजन कसे करायचे, सामान्य शेतकऱ्याला पाणी मिळावे, याबाबत सहसा कोणी बोलताना आढळले नाही.

कर्जतच्या अगोदर श्रीगोंद्याला पाणी देण्याची मागणी..

दरम्यान, आता पाचपुते समर्थकांसह राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी कर्जतच्या अगोदर पाणी श्रीगोंद्याला मिळावे, अशी मागणी उचलून धरली आहे. त्यासाठी आंदोलनाची धमकीही दिली जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील दुसरे आवर्तनाचे पाणी येण्यापुर्वीची वाढणारी धग विझणार की पेटणार हे पाहावे लागेल. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख