नगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून, शहरातील दोन ठिकाणी हाॅट स्पाॅट वाढविण्यात आले आहे. तसेच राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे गाव असलेले नेवासे तालुक्यातील सोनई येथे एकाच कुटुंबातील 10 जणांना बाधा झाल्याने गावातील सर्वांचीच तपासणी करण्यात येत आहे. हा परिसरही सील करण्यात आला आहे.
नगर शहरातील बुरुडगाव रोडजवळील काही भाग व नालेगाव ते बालिकाश्रम रोड जवळील काही भाग हाॅट स्पाॅट नव्याने करण्यात आला. यापूर्वीही तोफखाना, सिद्धार्थनगर परिसर हाॅट स्पाॅट आहेत. शहरात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरात संपूर्ण लाॅक डाऊन करण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 66 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्यांची संख्या आता 634 झाली आहे. आज दुपारपर्यंत जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्यांची संख्या आता 303 झाली असून, जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 957 झाली आहे.
सोनईत खबरदारीचे उपाय
सोनई येथील एकाच कुटुंबातील दहा जणांना बाधा झाल्यांतर या गल्लीतील सर्वच रस्ते प्रशासनाने पूर्णपणे बंद केले आहेत. तसेच गावातील सर्व व्यवहार बंद करून सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, यांनी खबरादीराचा उपाय म्हणून गावात विशेष पथके तैनात करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने 11 पथक कार्यरत केले असून, तपासणी करण्यासाठी 50 जण कार्यरत आहेत.
102 व्यक्तींची धाकधूक
संबंधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या 102 लोकांची कोरोनाविषयक तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सर्व लोकांची धाकधुक वाढली आहे. संपूर्ण गावच हाॅट स्पाॅट झाल्याने जीवनावश्यक वस्तुंसाठी नागरिकांचे हाल होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.
मंत्र्यांकडून विशेष दखल
मंत्री गडाख यांच्या गावातच कोरोनाने डोके वर काढल्याने आता नेवासे तालुक्यात सतर्कतेचे आदेश मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. नेवासे तालुक्यातील बाजारपेठेवर बंधणे टाकण्यात आले असून, गरजेनुसार ठिकठिकाणी लाॅक डाऊन अधिक कडक करण्यात येत आहे.

