पारनेर : मी यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार (कै.) वसंतराव झावरे यांच्याच बरोबर काम करत होतो. मात्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष हे विजय औटी आमदार झाल्यानंतर पारनेर शहरातील व माझ्या गावातील माणूस आमदार झाला आहे. ते शहराचा विकास करून शहराचा पाणी प्रश्न सोडवतील, या अशेने त्यांच्याबरोबर शिवसेनेत गेलो. मात्र गेल्या 15 वर्षात सत्ता असतानाही पाणी प्रश्न सुटला नाही. आता आमदार निलेश लंके यांनी शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याबरोबरच शहराच्या विकासाचा शब्द दिला आहे. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, असे नगरसेवक नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.
देशमुख म्हणाले, की मी या पुर्वीही कोणत्याही पदाची कधीच अपेक्षा केली नाही. मला शहराचा पाणी प्रश्न महत्वाचा वाटतो, तो सुटणे गरजेचे आहे. पारनेर नगरपंचायतीबरोबर कर्जत, जामखेड, नेवासे या नगरपंचायतींनी आपले पाणी प्रश्न सोडविले आहेत. मात्र पारनेरचा पाणी प्रश्न अद्यापही सुटला नाही. मी अनेक दिवसांपासून असतानाही औटी यांच्याच बरोबर काम करीत होतो व नगरपंचायत झाल्यानंतरही त्याच्याबरोबर होतो, मात्र गेली अनेक वर्षात हा प्रश्न सुटला नाही. याच वेदनेतून मी शिवसेना सोडली.
आमदार लंके हे तरूण आहेत, त्यांचा कामाचा आवाका मोठा आहे. ते पाणीप्रश्न सोडविल्याशिवाय राहाणार नाहीत. तसा शब्द्ही त्यांनी विधानसभा निवडणुकीपुर्वीच दिला आहे. मी पुर्वाश्रमीचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतो, आता पुन्हा आल्याने समाधान वाटले. मला भविष्यात नगरपंचायतीची उमेद्वारी मिळो अगर न मिळो, फक्त शहराचा पाणी प्रश्न सुटावा, हीच अपेक्षा आहे. मी कुठल्याही कामाची अपेक्षा या पुर्वी ठेवली नव्हती. माझ्यावर कुठलाही आरोप नाही. सध्या शहराचा विकास थांबला आहे, नेहमी मर्जीतील लोकांनाच कामे देणे जवळच्या कार्यकर्त्यांना किंमत न देणे, यामुळे आम्ही बाजुला झालो आहोत. पारनेर शहरासाठी 110 कोटीची योजना आराखडा तयार होता. ते विधानसभेचे उपसभापती झाल्यानंतर त्यांना तो सहज सोडविता आला असता. मात्र आमचा अपेक्षेचा भंग झाल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असेही देशमुख म्हणाले.
आमची घुसमट होत होती : गंधाडे
आम्ही गेली अनेक वर्ष माजी आमदार विजय औटी यांच्याबरोबर कोणत्याही पदाची अगर आर्थिक अपेक्षा न ठेवता एकनिष्ठेने काम केले. त्यांनी आम्हाला पाठबळ दिले नाही. आमची शिवसेनेत नेहमीच घुसमट होत होती. त्यामुळे शेवटी आम्हाला हा निर्णय़ घ्यावा लागला, असे मत नगरसेवक किसन गंधाडे यांनी व्यक्त केले.

