Was this the only way for the government to sell liquor for revenue? | Sarkarnama

सरकारकडे `महसूल`साठी दारुचाच मार्ग होता का? विनायक देशमुख यांचा घरचा आहेर

मुरलीधर कराळे
मंगळवार, 5 मे 2020

श्रीमंत लोक पिवून घरात बसतील, परंतु सर्वसामान्य लोक पिवून लाॅक डाऊनच्या काळात तमाशा उभा करतील. घरात बसून राहणे सक्तीचे असल्याने पत्नीला मारहाण करतील. हे मद्यपी लोक कोरोना कॅरिअर होऊ शकतात.

नगर : दारुबंदी उठवून सरकार काय साध्य करणार. केवळ महसूल मिळविण्यासाठी दारू विकून सर्वसामान्यांशी जिवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. श्रीमंत लोक पिवून घरात बसतील, परंतु सर्वसामान्य लोक पिवून लाॅक डाऊनच्या काळात तमाशा उभा करतील. घरात बसून राहणे सक्तीचे असल्याने पत्नीला मारहाण करतील. यातून सोशल डिस्टन्सचे काय होणार. हे मद्यपी लोक कोरोना कॅरिअर होऊ शकतात. म्हणजे आपण कोरोनाशी सामना करताना 20-20 जिंकलो, पण फायनल हरण्याची भिती महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केली.

महाआघाडीच्या सरकारने केवळ अर्थार्जनाचा विचार न करता त्यातून होणाऱ्या भयानक अनार्थाचाही विचार करून दारुची दुकाने सुरू करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी देशमुख यांनी एका मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. याबाबत काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनाही कळविले आहे.

कोरोना संकटामुळे देशात व राज्यात मोठे संकट आले आहे. सरकारकडे जमा होणाऱ्या महसूलात घट होत आहे, हे खरे असले, तरी सरकारच्या अर्थार्जनासाठी घेतलेला हा निर्णय जनतेसाठी धोकादायक ठरू शकतो. दारुची दुकाने खुली केल्याने दुकानासमोर गर्दी होते. दारू पिल्यानंतर मद्यपी सोशल डिस्टन्सींग पाळण्याची शक्यता खूपच धूसर आहे. या निर्णयामुळे मागील एक-दीड महिन्यांपासून केलेल्या तपश्चर्येवर पाणी पडू शकते. आगामी दहा-पंधरा दिवसांत कोरोना अधिक वेगाने फैलावू शकतो, असे त्यांनी वरिष्ठांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

दारुतून मिळवायचे अन आरोग्यावर खर्च करायचे

कोरोनाशी सामना करण्यासाठी यापूर्वीच मोठा निधी सरकारने खर्च केला. यापुढे जर कोरोनाचा फैलाव जास्त झाला, तर पुन्हा मोठा निधी खर्च करावाच लागेल. दारुच्या आहारी गेलेल्या लोकांकडून कोरोनाचा फैलाव वाढल्यास त्याला जबाबदार कोण. म्हणजे दारुतून मिळवायचे आणि दारुमुळे झालेल्या परिणामांवर खर्च करायचे, हे धोरणच चुकीचे आहे, असा आरोप देशमुख यांनी केला आहे.

घरातील भांडणे वाढतील

गेल्या दीड महन्यांपासून दारुची दुकाने बंद असल्याने पहिल्या काही दिवस मद्यपी लोकांनी जास्त किमतीत दारु खरेदी करून आपली दारुची नशा भागविली. नंतर महिनाभरापासून आपोआप गप्प पडले. आता दारु मिळू लागल्याने मागील `बॅक लाॅक` भरून काढण्यासाठी ही मंडळी पिवून घरात बसून कसे राहतील. लाॅक डाऊनमुळे घरातच थांबणे सक्तीचे असल्याने ही मंडळी पत्नीशी भांडतील. गल्लीत गोंधळ घालतील. श्रीमंत मंडळी घरात गप पडून राहतील, मात्र सर्वसमान्य मंडळी घरात थांबणार नाहीत. याचाही विचार सरकारने करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

मी सरकारमधला, तरीही विऱोध करणार

सध्या राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. त्यामध्ये शिवसेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेस मुख्य पक्ष आहेत. असे असताना तुमच्याच सरकारविरोधात बोलता, या प्रश्नावर बोलताना देशमुख म्हणाले, ``मी थोर नेते बाळासाहेब भारदे यांच्या विचारसरणीचा नेता आहे. राजकारण केवळ चांगल्या गोष्टींसाठी करतो आहे. आम्ही सरकारमध्ये असलो, तरी सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळण्याचा हा निर्णय मनाला पटत नाही. त्यामुळे या गोष्टीला माझा विरोधच असेल.``

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख