साईबाबांच्या दर्शनाला जायचेय, वेशभूषेबाबत हा नवीन नियम पाळा ! - Want to visit Sai Baba, remember these things about costumes! | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

साईबाबांच्या दर्शनाला जायचेय, वेशभूषेबाबत हा नवीन नियम पाळा !

सतीश वैजापूरकर
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

काही भाविक आक्षेपार्ह वेशभूषा करून साईदर्शनासाठी येतात. याबाबत अन्य भाविकांच्या तक्रारी येत आहेत. हे पवित्र ठिकाण आहे. सभ्यतेचे पालन होईल, अशी वेशभूषा असावी,

शिर्डी : साईबाबांची शिर्डी एकात्म भारताचे छोटे रूप समजले जाते. उत्सव व सरकारी सुट्यांच्या काळात परंपरागत वेषभूषेतील भाविक सहज नजरेस पडतात. त्याद्वारे विविधतेतून एकतेचे दर्शन घडते. मात्र, काही भाविक पाश्‍चात्य संस्कृतीचे अनुकरण करीत तोकडे कपडे घालून येथे येतात. काहींच्या विक्षिप्त वेशभूषेमुळे अन्य भाविकांनाच संकोचल्यासारखे होते. अशा आक्षेपार्ह वेशभूषांबाबत भाविकांच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे किमान सभ्यतेचे पालन होईल, असे कपडे परिधान करून साईदर्शनासाठी यावे, असे आवाहन करण्याची वेळ आज साईसंस्थानवर आली. तसे फलक साईमंदिर परिसरात ठिकठिकाणी लावले आहेत. 

लुंगी, अर्ध्या बाह्यांचा शर्ट, सुती आणि रेशमी साडी ही दाक्षिणात्य वेशभूषा, सलवार-कुर्ता, परंपरागत साडी, उत्तर भारत आणि पंजाबातील पगडी, अशा विविध वेशभूषेत आलेले भाविक येथे सहज नजरेस पडतात. मात्र, काही भाविक अतिशय तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी येतात. त्यांच्याकडे पाहून अन्य भाविकांनाच संकोच वाटतो. याबाबत साईसंस्थानकडे भाविकांच्या सातत्याने तक्रारी येत होत्या. किमान साईदर्शनासाठी येताना तरी, भाविकांनी अंगभर कपडे घालावेत, अशी अपेक्षा सामान्य भाविकांची असते. किमान सभ्यतेचे पालन होईल, असे कपडे परिधान करावेत, असे आवाहन करण्याची वेळ साईसंस्थानवर आली. 

साईसंस्थानचे कार्यकारी कान्हूराज बगाटे यांनी भाविकांना केलेल्या आवाहनात म्हटले आहे, की काही भाविक आक्षेपार्ह वेशभूषा करून साईदर्शनासाठी येतात. याबाबत अन्य भाविकांच्या तक्रारी येत आहेत. हे पवित्र ठिकाण आहे. सभ्यतेचे पालन होईल, अशी वेशभूषा असावी, अशी विनंती साईसंस्थानतर्फे करण्यात येत आहे. तथापी, भाविकांसाठी कुठलाही पोषाख निश्‍चित केलेला नाही. ही केवळ विनंती आहे. भारतीय संस्कृतीला साजेशी वेशभूषा असेल, तर चांगलीच बाब आहे. 

असभ्य वेषभुषेविषयी तक्रारी

सभ्येतेचे किमान पालन होईल, अशी भाविकांची वेशभूषा असावी, असे साईसंस्थानने केलेले आवाहन योग्यच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तोकडे कपडे व असभ्य वेशभूषेबाबत भाविकांच्या तक्रारी येत आहेत, असे साईसंस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी सांगितले.

त्या फलकाला पाठिंबा

भाविकांना संकोचल्यासारखे होईल, असे कपडे घालून साईदर्शनासाठी येऊ नये. कारण, अशा असभ्य वेशभूषेत आलेल्या भाविकांच्या तक्रारी येत आहेत. साईसंस्थानने आज साईमंदिर परिसरात विनंतीवजा फलक लावले असून, त्यास ग्रामस्थांचा पाठिंबा आहे,अशी प्रतिक्रिया शिर्डीतील कमलाकर कोते यांनी दिली.

 

Edited By - Murlidhar karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख