शिर्डीला जायचे ! साईदर्शनाचे नियोजन पहा, रोज मिळते केवळ 12 हजार भाविकांना दर्शन - Want to go to Shirdi! See the planning of Saidarshan, only 12 thousand devotees visit daily | Politics Marathi News - Sarkarnama

शिर्डीला जायचे ! साईदर्शनाचे नियोजन पहा, रोज मिळते केवळ 12 हजार भाविकांना दर्शन

सतीश वैजापूरकर
सोमवार, 21 डिसेंबर 2020

सशुल्क दर्शन व्यवस्था नियोजित तारखेपासून पुढे पाच दिवसांसाठी तर मोफत दर्शन व्यवस्था आरक्षण केल्याच्या तारखेपासून पुढे दोन दिवस उपलब्ध असेल. साई संस्थानच्या वेबसाईटद्वारे (ऑनलाईन डॉट साई डॉट ओआरजी डॉट इन) दर्शन आरक्षण करता येईल.

शिर्डी : नाताळ, सलग सरकारी सुट्या व वर्ष अखेर यामुळे भाविकांनी शिर्डीत मोठी गर्दी करू नये. ऑनलाईन दर्शन आरक्षण करून येतील, त्या भाविकांनाच साई समाधीचे दर्शन मिळेल. कोविडच्या प्रभावामुळे दररोज केवळ बारा हजार भाविकांची दर्शन व्यवस्था केली जाईल, अशी माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. 

या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व मुख्य लेखापाल बाबासाहेब घोरपडे उपस्थित होते. बगाटे म्हणाले, "ऑनलाईन व्यवस्थेत सशुल्क व निःशुल्क अशा दोन्ही पद्धतीच्या दर्शनाचे आरक्षण करता येईल. त्यात निःशुल्क दर्शनासाठी आठ हजार तर सशुल्क दर्शनासाठी चार हजार भाविकांना आरक्षण करता येईल. त्यासाठी फोटोची आवश्‍यकता आहे. साई पालख्यांनी या काळात येथे येऊ नये, असे आवाहन यापूर्वीच करण्यात आले आहे.'' 

""सशुल्क दर्शन व्यवस्था नियोजित तारखेपासून पुढे पाच दिवसांसाठी तर मोफत दर्शन व्यवस्था आरक्षण केल्याच्या तारखेपासून पुढे दोन दिवस उपलब्ध असेल. साई संस्थानच्या वेबसाईटद्वारे (ऑनलाईन डॉट साई डॉट ओआरजी डॉट इन) दर्शन आरक्षण करता येईल. दर्शन व्यवस्थेबरोबरच ज्या भाविकांना मुक्काम करायचा आहे. त्यांनी साई संस्थानच्या धर्मशाळेतील खोल्यांचे ऑनलाईन आरक्षण करावे. सव्वा महिन्यांपूर्वी साई मंदिर दर्शनासाठी खुले झाले. त्यावेळी दररोज शारीरिक अंतर पाळून सहा हजार भाविक दर्शन घ्यायचे. आता ही दैनंदिन भाविकांची संख्या बारा हजारांपर्यंत वाढली आहे. गेल्या सव्वा महिन्यांत सव्वा तीन लाख भाविकांनी साई दर्शन घेतले. एकाही संस्थान कर्मचाऱ्याला कोविडची बाधा झाली नाही,'' असे बगाटे यांनी सांगितले 

साई मंदिराच्या कळसाचे दर्शन घेण्यासाठी 31 डिसेंबरला देशभरातून किमान दोन ते अडीच लाख भाविक शिर्डीत येतात. कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा या गर्दीचे नियोजन करण्याचे आव्हान पोलिस, महसूल व साईसंस्थान समोर असेल. त्याबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. 

दरम्यान, साईदर्शनासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून भाविक येत आहेत. येण्याआधी दर्शनाचे नियोजन त्यांनी पाहणे आवश्यक आहे. त्यासाठी वेबसाईटवर माहिती देण्यात येत आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख